नागपूर : कोविड-१९च्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यापैकी केवळ ३८ रुग्णालये पूर्णत: कोविड-१९ रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहे. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्याअध्यक्षतेखाली नेमलेली पाच सदस्यीय समिती ६२ रुग्णालयांची शनिवार  सुनावणी घेणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासगी रुग्णालय कोविड-१९ रुग्णालय म्हणून सुरू करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाच्या काय समस्या आहेत. आणि रुग्णांना होणाऱ्या समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीचे गठन केले आहे. या समितीत महापौर, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, आयएमएचे अध्यक्ष आणि खासगीरुग्णालयाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अनिल लद्दड यांचा समावेश आहे. समितीची पहिली बैठक काल पार पडली. 


बैठकीला महापौरसंदीप जोशी, विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त सुधाकर तेलंग, मनपा आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी डॉ. अनिल लद्दड उपस्थित होते. सदर बैठकीत उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीचे नेमके कार्य काय, याबाबत चर्चा करण्यात आली.


गपूर शहरात कोविड-१९चा वाढता प्रकोप बघता आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणे आणि आरोग्य सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने १०२ रुग्णालये कोविड-१९ रुग्णालये म्हणून कार्यान्वित करण्यासाठी संबंधित रुग्णालयांना मनपातर्फे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ३८ रुग्णालयेच सद्यस्थितीत कोविड-१९ रुग्णालये म्हणून कार्यरत आहेत. यासंदर्भात काही रुग्णालयांनी उच्च न्यायालयात  याचिका दाखल केली. या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने पाच सदस्यीय समितीचे गठन केले. ही समिती उर्वरीत रुग्णालयांच्या समस्या  काय यासंदर्भात अभ्यास करून त्याचा अहवाल न्यायालयापुढे सादर करणार आहे.


त्याच अनुषंगाने खासगी रुग्णालयांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी समितीने शनिवार दुपारी २ ते ५  या वेळेत सुनावणी घेण्यात येणार आहे. यानंतर विदर्भ हॉस्पीटल असोशिएशन आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी बोलविण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांच्या समस्या ऐकून घेतानाच त्यांनी लवकरात लवकर कोविड-१९ रुग्णांसाठी मनपाला बेड्‌स उपलब्ध करून द्यावेत, यासंदर्भातही त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.


समितीचे कामकाज योग्य पद्धतीने व्हावे, समिती आणि खासगी रुग्णालय प्रशासनामध्ये योग्य समन्वय साधला जावा,यासाठी समितीचे सचिव म्हणून उपायुक्त मिलिंद मेश्राम यांची नेमणूक या बैठकीत करण्यात आली. बैठकीला उपायुक्त मिलिंद मेश्राम, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.