आतिश भोईर, झी २४ तास, मुंबई : एलफिन्स्टन आणि अंधेरी पूल दुर्घटनेच्या जखमा ताज्या असताना मुंबईकरांना आणखी एका पूल दुर्घटनेने धक्का दिला आहे. सीएसएमटी स्थानकाजवळील पूल दुर्घटनेत 6 निष्पापांचा नाहक बळी गेला. यामध्ये तीन महिलांचा समावेश होता. जीटी रुग्णालया परिचारीका असलेल्या अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे यांची ही कहाणी...रुग्णालय गाठण्याच्या हेतूने त्यांनी घर सोडलं खरं मात्र कधीही परत न येण्यासाठी असं कुणालाही वाटलं नव्हतं. यामध्ये चूक कोणाची ? याचा उहापोह पुढचे काही दिवस होत राहील. निवडणुका जवळ आल्याने यावर राजकारण होणेही स्वाभाविक आहे. हा पूल रेल्वेच्या अख्त्यारित आहे असे पालिकेतर्फे सांगण्यात येत आहे तर पालिकेच्या अख्त्यारित असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात येतंय. एका बाजुला निष्पापांचा बळी गेला असताना इथे जबाबदारीची टोलवाटोलव सुरू आहे. पण मृतांच्या नातेवाईंकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे यापैकी कोणाकडेच नाही आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले आहे. पण हे या प्रश्नाचे उत्तर आहे का ? वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे मुंबईकर भावनाशुन्य झाले आहेत का ? सकाळी कामाला गेलेली घरातील व्यक्ती सुरक्षित घरी येईल याचे कोणी आश्वासन देईल का ? अजून किती सामान्य माणसांचे यामध्ये बळी जाणार ? असे अनेक प्रश्न मनात घर करत आहेत. कालच्या दुर्घटनेत बळी गेलेल्या महिलांच्या घरून आणि मित्र परीवारांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.   


पूल दुर्घटना : मुंबई महापालिकेचे रेल्वेकडे तर रेल्वेचे पालिकडे बोट



 घरातले सगळं दिवसभरातलं काम आटपून, कुटुंबीयांचं जेवणखाणं बनवून, चार घास आपल्या पोटी उतरवत दर दिवसासारखीच रुग्णांची सेवा करण्याच्या उद्देशाने त्या सकाळी घरातून बाहेर पडल्या होत्या. डोंबिवलीकरांसाठी गुरुवारचा दिवस दु:खाचा ठरला. सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग कोसळला. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवली पश्चिम भागात राहणाऱ्या तीन परिचारिकांचा नाहक बळी गेला. अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे मुंबईच्या जीटी रूग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. ड्युटीवर येणाऱ्या या तिंघींच्या मृत्यूने जीटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  


भक्ती शिंदे ह्या डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ रोड इथल्या ओमसाई दत्त बिल्डिंग मध्ये राहात होत्या. नवरा, सासू, 14 वर्षांचा मुलगा आणि त्या असं त्यांचं कुटुंब होतं. भक्ती यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतप्त भावना आहेत. पुलाची जबाबदारी कोणाची ? आरोपींवर काय कारवाई होणार या सर्वांमुळे यांच्या कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य परत येणार आहे का ? या भावना व्यक्त होत आहेत. 


'त्या' पुलाची जबाबदारी आमच्यावर होती; अखेर मुंबई महानगरपालिकेला उपरती


अपूर्वा प्रभू  ह्या आपला नवरा, १२ वर्षाचा मुलगा गणेश आणि नऊ वर्षाची मुलगी चिन्मयी यांच्यासोबत ठाकूरवाडीतील उदयराज इमारतीत राहत होत्या. त्याही हा दुर्घटनेच्या बळी ठरल्या. रंजना तांबे ह्या देखील जीटी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या गणेशनगर इथल्या शिवसागर अपार्टमेंट  आपल्या आई आणि भावासोबत त्या राहत होत्या. एका दुर्घटनेने होत्याचं नव्हतं झालं आणि ही कुटुंबही दु:खाच्या सागरात बुडाली आहेत. 


मुंबई पूल दुर्घटना : 'स्ट्रक्चरल ऑडिटरवर खुनाचा गुन्हा दाखल करा'


यांच्या कुटुंबीयांवर, नातेवाईकांवर एक प्रकारे दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. प्रत्येक मुंबईकर हा रोज घराबाहेर पडताना जीव मुठीत घेऊनच बाहेर पडणार का ? हे सर्व कधी थांबणार ? आमच्या सुरक्षेचं काय ? ह्या सर्व प्रश्नाची उत्तर मिळणार तरी कधी ? यांचे कुटुंबिय, मित्रपरिवार, शेजारी अशा प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ज्याची उत्तरे रेल्वे प्रशासन, पालिका कोणाकडेच नाही आहेत.