आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : विधानसभा निवडणूक २०१९ साठी महाराष्ट्रात २८८ जागांवर मतदान सुरु आहे. गडचिरोली तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र रेगडी हद्दीतील मौजा वेंगणुर येथील बूथ, सुरक्षेच्या कारणास्तव मौजा रेगडी येथे हलविण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी पोस्टर व बॅनरच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांना मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. मात्र मौजा वेंगणुरवासीयांनी नक्षलवाद्यांनी केलेल्या आवाहनाला न जुमानता उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथील नागरिकांनी घराबाहेर पडत १३ किमीच्या जंगलातून तसेच वाटेत येणाऱ्या कन्नमवार जलाशयाच्या नाल्यातून बोटीने प्रवास करत आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावत लोकशाहीवर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. ग्रामस्थांनी, आपला नेहमीच लोकशाहीला पाठिंबा असून नक्षलवाद्यांच्या भूलथापांना आपण कधीच बळी पडणार नसल्याचे सांगितले. यात महिला व वृद्धांचा सहभाग लक्षणीय होता. 



  


या मतदान केंद्रावर गडचिरोली पोलिस दलातर्फे वेंगणुर ग्रामस्थांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नक्षल दहशतीला भीक न घालता वेंगणुर येथील ग्रामस्थांनी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्याच्या कृतीचे अभिनंदन केले जात आहे.