नवी दिल्ली : 'शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद द्यायचं का, याचा विचार निवडणुकीच्या निकालानंतर करु, असं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीनं इक्बाल मिरचीशी असलेल्या संबंधांच्या आरोपांचा खुलासा करावा, असं आव्हानही अमित शाह यांनी शरद पवारांना दिलं आहे. झी मीडियाचे समूह संपादक सुधीर चौधरी यांनी घेतलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत अमित शाह यांनी विविध विषयांवर रोखठोक उत्तरं दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महाराष्ट्रात एनडीएचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्रात एनडीएला बहुमत मिळेल असा त्यांना पूर्ण विश्वास आहे.' शिवसेना महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा दावा करत आहे यावर उत्तर देताना अमित शहा यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्रात एनडीएचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील.'


महाराष्ट्रात शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल का यावर बोलताना अमित शहा यांनी म्हटलं की, 'याचा निर्णय हा निवडणुकीच्या निर्णयानंतर घेतला जाईल.' पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार असा दावा शिवसैनिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केला जात आहे.


पंतप्रधान मोदी यांच्यानंतर तुमचं नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे यावर उत्तर देतांना अमित शहा यांनी म्हटलं की, 'पंतप्रधान मोदी हे अनेक वर्ष अजून सरकार चालवतील. मोदी यांच्यानंतर माझ्या नावाची चर्चा नाही. पक्षात माझ्या पेक्षाही अनेक मोठे नेते आहेत.'