Dombivli MIDC Blast : भीषण स्फोटानं डोंबिवली एमआयडीसी पुन्हा एकदा हादरली. एमआयडीसीमधील अमुदान कंपनीमध्ये (Amudan Chemcal Company) बॉयरचा स्फोट झालाय. या स्फोटात 7 कामगारांचा मृत्यू झाला तर 48 जण जखमी झालेत. स्फोटामुळे 200 मीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्याचीही फुटल्या. जवळपासच्या केजीएन केमिकल कंपनी, मेहता पेंट, सप्त वर्ण आणि ह्युंदाई शोरूममध्येही आग लागली. या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. जखमींना डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर नेपच्यून हॉस्पिटलमध्ये 15 जणांवर उपचार सुरु आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवासी भागातील लोकांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर
डोंबिवलीतल्या या घटनेमुळे औद्योगिक भागातील कारखाने, या कारखान्यात काम करणारे कामगार आणि या परिसरात राहाणाऱ्या लोकांची सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. याआधी 24 मे 2016 मध्ये प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू तर 100हून अधिक जखमी झाले होते. ऑगस्ट 2020मध्ये अंबर कंपनीत स्फोट झाला होता, याचे हादरे  आजूबाजूच्या वस्तीपर्यंत जाणवले होते. याबाबत डोंबिवलीतील नागरिक आदित्य बिवलकर यांनी या भागातील परिस्थितीची वस्तूस्थिती मांडली


डोंबिवलीत जवळपास 250 कारखाने
डोंबिवलीतील औद्योगिक भागामध्ये रायायनिक, टेक्स्टाईल, फार्मा, रबर,प्लास्टिक असे जवळपास 250 कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये वेगवेगळे  रासायनिक पदार्थ, विषारी वायू नियमितपणे हाताळले जातात तरीही या कारखान्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जात नाही. या आधीही औद्योगिक विभागातील कंपन्यांमध्ये आग लागून दुर्घटना घडलेल्या आहेत तरीही अद्याप इथल्या बऱ्याच कारखान्यांमध्ये धोक्याची सूचना देणारे अलार्म आणि सेन्सर यंत्रणा सक्रीय नाहीत. त्याचबरोबर आपत्तीकालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना कशाप्रकारे करावा याचे प्रशिक्षण येथील कामगारांना देण्यात आलेले नाही. बहुसंख्य कंपन्या कॉस्ट कटिंगच्या नावाखाली सुरक्षेच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष करताना दिसतात.


औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय यांच्यामार्फत नियमाने कारखान्यांच्या आराखड्याला मंजुरी देता येते. नियमानुसार दोन कारखान्यांच्यामध्ये त्याचबरोबर कारखाना आणि त्याचे प्रवेशद्वार यांच्यामध्ये 3 ते 4 मीटरचं अंतर असणे बंधनकारक आहे. कारखान्याच्या आराखड्यामध्ये मोकळी जागा दाखवली असली तरीही नंतर तिथे बांधकाम केलं जातं आणि या बांधकामामुळेच एखादी दुर्घटना झाल्यास ती समस्या अधिक गंभीर होते.


सुरक्षेची कोणतीही खबरदारी नाही
कारखान्यांसाठी स्वतंत्र सुरक्षा अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची आवश्यकता असताना केवळ पैश्यांची बचत करण्यासाठी बऱ्याच कारखान्यामध्ये एकाच व्यक्तीवर संपूर्ण जबाबदारी टाकण्यात आली आहे. यामुळे बऱ्याचवेळा सुरक्षेकडे दूर्लक्ष होते. रासायनिक क्षेत्रातील तज्ञ मंडळींद्वारे कारखान्यामध्ये नियमितपणे सुरक्षेबाबत माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना मध्यंतरी करण्यात आली होती परंतु कारखान्यांचे मालक मात्र याकडे दूर्लक्ष करत आहेत याचमुळे समस्या अधिक तीव्र होतात.


निवासी भागाला सगळ्यात जास्त धोका
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या औद्योगिक भागातील समस्यांचा येथील निवासी भागातील लोकांना सगळ्यात जास्त त्रास होत आहे. डोंबिवली एमआयडीसी मध्ये प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे .एमआयडीसी भागातील कंपन्यांवर कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शासनाच्या नियमानुसार एमआयडीसीतील औद्योगिक कंपन्या आणि निवासी विभाग यामध्ये ठराविक अंतर असण्याची गरज आहे पण प्रत्यक्षात मात्र एमआयडीसी निवासी विभाग आणि कंपन्या यामध्ये अंदाजे  200 ते 300 मीटर इतकंच अंतर आहे. त्यामुळे कुठलीही मोठी दुर्घटना झाली तरी त्याचा फटका इथल्या निवासी भागाला सहन करावा लागतो. वाढत्या प्रदुषणामुळे निवासी भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नसुद्धा निर्माण झाला असतानाच स्फोटासारख्या घटनेने एमआयडीसीतील रहिवासी भयभीत झाले आहेत