मुंबई : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर (79 ) यांचे पुण्यात राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. (Dr. Arun Nigvekar Pass Away at Pune) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली  वाहिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉ. निगवेकरांच्या पुण्यातील निवासस्थानी कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. अरुण निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. 1998-2000 या काळात ते पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर कार्यरत होते. यानंतर 2000 ते 2005 या कालावधीत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद भूषवले होते. याशिवाय शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘नॅक’चे ते संस्थापक संचालक देखील होते.



भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण आणि आधुनिकतेचा प्रवाह आणणारा महान वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांच्या निधनामुळे आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरूण निगवेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


अजित पवार यांची श्रध्दांजली


डॉ.अरुण निगवेकर सरांनी देशातील शिक्षणाचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आयुष्यभर त्यांनी पदार्थ विज्ञाना सारख्या कठीण विषयात संशोधनासह अध्यापनाचे अनमोल कार्य केले. पुणे विद्यापीठात शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आणि त्याचा लौकिक वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कुलगुरु म्हणून काम करताना त्यांनी पुणे विद्यापीठाला वेगळ्या उंचीवर नेले. ‘नॅक’चे संशोधन संचालक म्हणून डॉ.अरुण निगवेकर सरांनी भारतातील व्यापक आणि क्लिस्ट अशा उच्चशिक्षण पद्धतीसाठी गुणवत्ता मापन करण्याची सरळ आणि सोपी पद्धत विकसीत केली. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द संस्मरणीय राहिली.  शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला डॉ. निगवेकर सरांचे कार्य कायमच प्रेरणा देत राहील, त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील दिपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.