बीड : राज्यात अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती असल्याने अधिवेशनात त्यावर चर्चा करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, सरकार पळपुटेपणा करत आहे. केवळ नऊ दिवसांचे हिवाळी अधिवेशन घेत आहेत, ते किमान तीन आठवडे चालावे, अशी आमची मागणी आहे, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होत असून येत्या ९ नोव्हेंबर ते  ३० नोव्हेंबर दरम्यान होणारेय. दोन आठवडे अधिवेशन चालणार असलं तरी शासकीय सुट्ट्यांमुळे प्रत्यक्षात ९ दिवसच कामकाज होणारेय. मात्र गुरुनानक जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी ही कामकाज चालवण्याचा  निर्णय घेण्यात आलाय. मात्र केवळ ९ दिवस कामकाज चालण्यावरून विरोधी पक्षानं अधिवेशन कालावधी ३ आठवडे करण्याची मागणी केलीय.



त्यावर गरज लागली तर शनिवारीही कामकाज घेऊ, अधिवेशन दरम्यान कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत वेळ वाढवण्याबाबत चर्चा करू तसंच विरोधकांनी गोंधळ न घालता कामकाजात सहभागी होण्याचं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलंय.