मुंबई ते नवी मुंबई प्रवासाचा नवा पर्याय, डिसेंबरमध्ये वॉटर टॅक्सी सुरू होतेय, असे असेल तिकिट दर
Mumbai Water Taxi: मुंबई ते नवी मुंबई प्रवासाचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. डिसेंबर महिन्यात वॉटर टॅक्सी सुरू होत आहे. जाणून घेऊया प्रवासी भाडे आणि रूट कसा असेल.
Mumbai Water Taxi: गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर प्रवास अवघ्या एख तासात होणार आहे. लवकरच या मार्गावर वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळं चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईहून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास सोप्पा होणार आहे. डिसेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गोव्यात चार बोटींची बांधणी करण्यात येत असून त्यापैकी दोन बोटी पुढील महिन्यात मुंबईत दाखल होऊ शकतात.
गेल्या काही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीच्या मदतीने गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर, मांडवा अशी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली होती. 200 प्रवाशी क्षमता असलेली ही वॉटर टॅक्सी अल्पप्रतिसादामुळं कालांतराने बंद करण्याचा निर्ण. घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे. मुंबई सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांच्यावतीने जलवाहतुकीला चालना देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येत आहे.
मुंबईतून नवी मुंबई गाठायचं म्हटल्यास रस्ते मार्गे एक तासांचा वेळ लागतो. कार्यालयीन कामाच्या वेळात वाहतुक कोंडीमुळं अधिकचा वेळ लागतो. त्यामुळं नवी मुंबईकरांना प्रवासाचा आणखी एख पर्याय समोर आला आहे. ई-वॉटर टॅक्सीमुळं एक तासांत गेट वे ते बेलापूरपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल, अशीदेखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. वॉटर टॅक्सी ही इलेक्ट्रिकवर चालणारी अशल्याने प्रदुषणालाही आळा बसणार आहे. हार्बर सर्व्हिस या खासगी संस्थेला चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर दैनंदिन जलवाहतूक सुरू होईल, अशी माहिती हार्बर सर्व्हिस कंपनीकडून देण्यात आली आहे. 24 प्रवासी आसन क्षमता असलेली ही वॉटर टॅक्सी तूर्तास गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी सुरू करण्यात येत आहे. तशी परवानगी मुंबई बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळाने दिली आहे.
प्रवासी भाडे किती आणि वेळापत्रक कसे असेल?
गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी दैनंदिन सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत दर तासाने गेट वे आणि बेलापूर जेट्टीवरून ई वॉटर टॅक्सी सुटतील. या सेवेच्या दररोज दहा फेऱ्या होतील.
ई-वॉटर टॅक्सी इतर बोटींच्या तुलनेत अधिक वेगवान असून त्यामुळं बेलापूरला एक तासात तर एलिफंटाला अर्ध्या तासात पोहोचता येणार आहे या प्रवासासाठी 100 ते 150 रुपये भाडे आकारले जाणार आहे.