खळबळजनक ! नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून पाच लाखांच्या नोटा गायब
सीसीटीव्ही कुठेच उपलब्ध नसल्यामुळे व्यवस्थापनाची कोंडी झाली आहे.
योगेश खरे, नाशिक : संपूर्ण देशात चलन छापणाऱ्या नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये पाच लाख रुपये गायब झाल्याने गोंधळ उडालाय. गेल्या आठवड्यात हा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी गोपनीय चौकशी सुरू करत दोषी कर्मचारी शोधण्याचा प्रयत्न सुरू झालाय. रिझर्व बँकेच्या प्रेसमध्ये दोन हजाराच्या नोटा तर नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये पाचशेच्या आणि दोनशेच्या नोटा सह सर्व छोट्या नोटांची छपाई केली जाते. या प्रेस मधून 200 आणि 500 रुपयाची छापलेल्या नोटाचे कागद गेल्या आठवड्यात गायब झाली होती. करन्सी नोट प्रेस मध्ये ज्या ठिकाणी छपाई होते त्या ठिकाणी सीसीटीव्ही कुठेच उपलब्ध नसल्यामुळे व्यवस्थापनाची कोंडी झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून याबाबत गोपनीय चौकशी सुरूये. मात्र नेमके दोषी कोण?, कोणी या नोटा गायब केल्या त्याचबरोबर कुठल्या युनिट मधून सफाई करताना हे पैसे गायब करण्यात आले. या बद्दलची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. एका युनिटमध्ये अडीचशे ते तीनशे लोकं काम करत असल्यामुळे कोणत्या शिफ्ट मधून कोणत्या वेळेस हे पैसे गायब झाले याचा शोध घेणे सुरू आहे.
नोटा छापल्यानंतर बॉक्समध्ये पॅकिंग करून रिझर्व बँकेला ते पाठवण्यात येतात. त्यावेळी मोजदाद करताना हा सर्व प्रकार उघड झाला आहे. रिझर्व बँकेच्या सही शिक्का आणि नंबर असलेली ही छपाई असली तरी रिझर्व्ह बँकेमधून त्याला अधिकृत वापरण्याची मान्यता मिळालेली नाही. असं असताना ही रक्कम गायब झाल्याने करन्सी नोट प्रेस मधील व्यवस्थापन हादरलेय. प्राथमिक स्तरावर ही रक्कम समोर आली असली तरी यामध्ये वाढ होऊ शकते.
या सिक्युरिटी प्रेसला सीआयएसएफ म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्यूरिटी फोर्सची सुरक्षा आहे, असे असताना इतकी मोठी रक्कम काय झाल्याने प्रेसचा प्रत्येक काना कोपरा शोधला जातोय. हा प्रकार उघड झाल्यानंतर सीआयएसएफ सतर्क झालीये. पूर्वी कर्मचाऱ्यांची चेकिंग न करता येजा सुरवसे किंवा काही विशिष्ट नेत्यांना पदाधिकाऱ्यांना या मधून पूर्णपणे सुट दिली जात असे. मात्र आता प्रत्येक कर्मचाऱ्याची कसोशीने तपासणी करण्यात येते प्रत्येकाला आयकार्ड कंपल्सरी करण्यात आलेत. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या लॉकरमध्ये मोबाईल ठेवणे आणि वापराची सुविधा काढून घेण्यात आलीये.
या घटनेबाबत पोलिसात तक्रार करण्यासाठी व्यवस्थापनाने तयारी सुरू केलीये. गेल्या 24 तासापासून उपनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची आणि नाशिक शहर पोलिसांशी चर्चा सुरू करण्यात आलीये. कोणत्या स्वरूपाचा हा गुन्हा करावा याबद्दल खल पोलिसात आणि व्यवस्थापनात सुरू आहे. नोटा रिझर्व बॅंक यांना अजून प्राधिकृत केल्या नसल्याने व्यवस्थापनाची अडचण निर्माण झालीये.