Maharashtra Minister Car Accident At 2 AM:  यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला शुक्रवारी पहाटे रात्री भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये संजय राठोड एअर बॅग्स उघडल्याने वाचले. या अपघातानंतर अपघातग्रस्त गाड्या चक्क क्रेनच्या मदतीने बाजूला कराव्या लागल्या इतका जोरदार अपघात रात्री झाला. 


धडक एवढ्या जोरात होती की मंत्र्याच्या कारमुळे केळी घेऊन जाणारी पिकअप पलटली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रात असून ते यवतमाळलाही येणार आहेत. त्यासाठी पोहरादेवी येथे तयारीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी रात्री विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यवतमाळचे पालकमंत्री म्हणून संजय राठोड या बैठकीला उपस्थित होते. रात्री उशीरापर्यंत कार्यक्रम स्थळाचा आढावा आणि बैठक संपवल्यानंतर तिथून यवतमाळला परत जात असताना संजय राठोड यांच्या कारला कोपरा गावाजवळ अपघात झाला. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिग्रसजवळच्या कोपरा गावाजवळ राठोड यांच्या वाहनाने केळी घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की केळी घेऊन जाणारी ही पिकअप व्हॅन पलटी झाली. या अपघातामध्ये पिकअप व्हॅनचा चालक जखमी झाला आहे. व्यापाऱ्याचं नुकसान टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेली केळी दुसऱ्या वाहन्यात भरुन पोहरागडला पाठवण्यात आली.


वेळीच एअर बॅग उघडल्याने बचावले


सुदैवाने आमदार राठोड आणि त्यांचा चालक बचावले. राठोड यांच्या गाडीने पिकअपला मागून धडक दिल्याने कारचा समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. वेळीच या कारमधील एअर बॅग उघडल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. संजय राठोड हे उद्या पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित दौऱ्यासंदर्भातील तयारीची आढावा घेऊन यवतमाळकडे परत येत असताना हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या पिकअप चालकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.


मोदींचा उद्याचा कार्यक्रम अन् मान्यवरांची उपस्थिती


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी पोहरागड येथे नंगारा संग्रहालयाचं उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरु आहे. गुरुवारी ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच कार्यक्रमाचं नियोजनासंदर्भात विशेष बैठक घेण्यात आली. याच तयारीच्या बैठकीला उपस्थित राहून आढावा घेऊन संजय राठोड यवतमाळला परत येताना अपघात झाला.