लातूरहून वैभव बालकुंदे रिपोर्टर : उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आली. लातूरच्या औसा इथं हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगची आज पुन्हा तपासणी करण्यात आली. कालच यवतमाळमध्येही ठाकरेंच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त करत मोदी-शाहांसह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे भरारी पथकाच्या सदस्यांचीच उलटतपासणी


यवतमाळच्या वणीत उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणी झाली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बॅगांची तपासणी सुरु केल्यानं मोठा वाद निर्माण झालाय. उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका सुरु केली असताना आज पुन्हा लातूरच्या औसात उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भरारी पथकाच्या सदस्यांचीच उलटतपासणी केली.


शरद पवार यांचा आरोप


सध्या महाराष्ट्रात राजकीय नेत्यांचा राजकीय प्रचार मोठ्या धुमधडाक्यात सुरु आहे. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये सभेसाठी जात असताना अचानक त्यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बॅगांच्या तपासणीवर शरद पवारांनीही टीका केलीय. सत्तेचा वापर करुन विरोधकांना त्रास देण्याचं सत्ताधाऱ्यांनी ठरवल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. 


संजय शिरसाट यांचा सवाल 


उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आली. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की,  निवडणूक आयोग त्यांचं काम करतंय. कुणाच्या बॅगा तपासल्या तर त्यावर त्रागा कशाला असा सवाल शिवसेनेनं केलाय.


नितीन गडकरींच्या बॅगांची तपासणी


आतापर्यंत विरोधकांच्या बॅगांची तपासणी होत होती. पण टीका होऊ लागल्यानंतर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं लातूरच्या किल्लारीत नितीन गडकरींच्या बॅगांची तपासणी केली. त्या तपासणीत खाण्यापिण्याच्या वस्तू सोडल्या तर भरारी पथकाला काहीही आढळलं नाही. जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या बॅगांची तपासणी होईल तेव्हाच विरोधकांचा राग शांत होईल अशी अपेक्षा आहे.