प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर :  कोल्हापुरात (Kolhapur News) एकाच गावात चार तरुणांनी आपलं जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. चार तरुणांच्या आत्महत्यानंतर गावात नेमकं काय सुरुय अशी भीती गावकऱ्यांमध्ये निर्माण झालीय. करवीर तालुक्यातील वाकरे गावामध्ये (vakare) चार तरुणांनी आत्महत्या केल्याने गावकऱ्यांना धक्का बसला आहे. खळबळजनक म्हणजे समुपदेशन केल्यानंतरही एका तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केली. दुसरीकडे वाकरे गावातील दीड महिन्यातील ही चौथी घटना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे गावात एकाच गावातील या चार तरुणांनी आपलं जीवन संपवलय. कोणी विष घेऊन तर कोणी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. अवघ्या दीड महिन्यात गावच्या या तरण्याबांड पोरांनी जगाचा निरोप घेतल्याने गाव देखील हादरून गेलाय. विशेष म्हणजे यातील एका तरुणाचे नुकतेच समुपदेशन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही विशाल कांबळे या तरुणाने आत्महत्या केली आहे.


आत्महत्या केलेल्या चौघां तरुणांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे. चौघेही कामधंदा करून आपल्या घरी सुखी होते. मात्र अचानक चौघांनीही जीवन संपवल्याने गाव पुरतं हादरून गेलं आहे.  9 डिसेंबर 2022 रोजी युवराज पवार या तरुणाने आत्महत्या केली. त्या पाठोपाठ गावातीलच शुभम पोवार, नितीन मोरे यांनी आत्महत्या केली. तर दोनच दिवसांपूर्वी विशाल कांबळे या तरुणाने आत्महत्या केली आहे. 


समुपदेशनानंतरही घेतला गळफास


वाकरे गावात होत असलेल्या आत्महत्या पाहून गावकरी पुरते हादरले होते. त्यामुळे गावातील तरुणांचे समुपदेशन करण्यात येत होते. यामध्ये विशाल रामचंद्र कांबळे (26) याचेही मार्गदर्शन करुन समुपदेशन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही विशालने टोकाचे पाऊल उचलले. विशाल हा फरशी बसवण्याचे काम करत होता. गुरुवारी विशालच्या वडिलांनी त्याला अंघोळीसाठी हाक मारली होती. पण बराच वेळ खोलीतून विशाल बाहेर न आल्याने त्याच्या वडिलांनी वरच्या खोलीत जाऊन पाहिले. खोलीत विशालने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती करवीर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी याबाबत चौकशी सुरु केली आहे.