गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वेध लागले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व ट्रेनचं बुकिंग फुल झालं असून एसटी, ट्रॅव्हल्ससह खासगी वाहनांचा पर्याय अवलंबला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती. तसंच प्रशासनाला चाकरमान्यांचा प्रवास सुखाने व्हावा यासाठी काळजी घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान आता राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशासनाच्या आदेशानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासह अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यातच आता मुंबई-गोवा महामार्गावरून 5 सप्टेंबरपासून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमन्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. नंतरच्या परतीच्या प्रवासासाठी देखील मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 11 ते 13 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  


दरम्यानच्या कालावधीत 16 टन किंवा त्याहून अधिक वजन क्षमतेच्या वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावरून वाहतुकीस बंदी घालण्यता आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून 5 सप्टेंबरपासून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असेल.