गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : 'गंगाखेड शुगर्स अॅन्ड एनर्जी' या रत्नाकर गुट्टेच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कोट्यवधींचं पीक कर्ज उचलल्याचे पुरावे 'झी मीडिया'च्या हाती लागलेत. एकूण सहा बँका आणि कारखान्याने संगनमत करून हा घोटाळा केल्याचा आरोप बँकांवर होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गंगाखेड शुगर्स अॅन्ड एनर्जी' या रत्नाकर गुट्टेच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कोट्यावधींचं पीक कर्ज उचललंय. त्यासाठी कारखान्यानं सहा बँकांशी संगनमत केल्याचं बोललं जातंय. सोशल मीडियावर काही बँकांची नवं व्हायरल झालीत. त्यांची पडताळणी करण्यासाठी 'झी मीडिया'च्या प्रतिनिधींनी सिंडिकेट बँकेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँक अधिकारी यासंदर्भात काहीही बोलण्यास तयार नाहीत.


सिंडीकेट बँकेच्या परभणी शाखेतून शेतकऱ्यांनी स्टेटमेंट काढलं असता यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांवर कर्ज असल्याचे  उघड झालंय. पूर्णा तालुक्यातील वझुर गावचे रामेश्वर भगवान दुधाटे आणि त्यांच्या पत्नी उषा रामेश्वर दुधाटे यांचं नाव सिंडीकेट बँकेच्या यादीत आहे. रामेश्वर दुधाटे यांच्या नावे 9 फेब्रवारी 2016 रोजी 2 लाख 22 हजार तीनशे रुपयांचं तर त्यांच्या पत्नी उषा दुधाटे यांच्या नावे 3 लाख रुपयाचे कर्ज उचल्याचं स्टेटमेंट मधून समोर आलंय. शेतकऱ्यांच्या नावाने या बँकेत परस्पर खाते उघडण्यात आलेत आहेत. आता व्याजासहित या दांपत्याच्या नावावर सिंडीकेट बँकेच 5 लक्ष 72 हजार रुपयाच कर्ज आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे, आत्तापर्यंत त्यांना याची कल्पनाही नव्हती.


दुसरीकडे याच बँकेतून ग्रामीण बँक परभणीचे शाखा व्यवस्थापक अच्युत दुधाटे यांच्या नावानेही परस्पर पीक कर्ज उचलल होतं. पण ते पीक कर्ज परस्पर भरल्या गेल्याचं सिंडीकेट बँकेने दिलेल्या प्रमाणपत्रातून दिसून येतंय. दरम्यान, या घोटाळ्यासंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. तसंच राज्यपालांचीही भेट घेतलीये.. हाय कोर्टाने गंगाखेड प्रकरणी विशेष तपास पथक नियुक्त करण्याचे आदेश देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.


दुसरीकडे आपल्या विरोधात कोर्टात किंवा पोलिसांत शपथपत्र दिल्यास शेतकऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप गुटेंवर होतोय. त्यमुळे या प्रकरणी प्रशासन आता काय पावलं उचलणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.