गणेश भक्तांसाठी चांगली बातमी, रत्नागिरीसाठी विशेष रेल्वे
कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एक चांगली बातमी आहे.
मुंबई : कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरीसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ३०, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर दरम्यान या गाड्या सोडण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरीसाठी या गाड्या धावणार आहेत.
गणपती उत्सवासाठी प्रवाशांची जास्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या सहकार्याने लोकमान्य टिळक आणि रत्नागिरी स्थानकांदरम्यान जादा विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे क्रमांक ०१२२७ आणि ०१२२८ लोकमान्य टिळक टर्मिनस - रत्नागिरी - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड्या सुरु करण्यात येणार आहे.
रेल्वे क्रमांक ०१२२७ लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन रत्नागिरीसाठी ही गाडी ३०तारेखाला टिळक टर्मिनस येथून रात्री ८.५० वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी रत्नागिरीला ६.४० वाजता पोहोचेल.
रेल्वे क्रमांक ०१२२८ ही गाडी रत्नागिरी - लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष रत्नागिरी येथून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला दुपारी ४.१५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
या गाडीला एकूण २४ डब्बे असणार असून एक टू टायर एसी, थ्री टायर एसी तीन डब्बे, स्लीपरचे १४ डब्बे, जनरलचे ४ डब्बे आणि एसएल आरचे दोन डब्बे असणार आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.