नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला दोन ठिकाणी जबरदस्त धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुळगावी तसेच त्यांनी दत्तक घेतलेल्या गावी भाजपचा पाठिंबा असलेल्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.  गडकरी यांचे मूळ गाव धापेवाडा आणि त्यांनी दत्तक घेतलेले पाचगाव या दोन्ही ठिकाणी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराने बाजी मारली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


धापेवाडा इथे काँग्रेस पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार सुरेश डोंगरे विजयी झालेत. त्यांना १६ मते मिळाली तर भाजपच्या उमेदवाराला एक मत मिळाले. दत्तक गाव पाचगाव इथे काँग्रेस पुरस्कृत सरपंच पदाच्या उमेदवार उषा ठाकरे विजयी झाल्या आहेत. त्यांना १० मते मिळाली तर भाजप उमेदवाराला एक मत मिळाले आहे. दरम्यान, गडकरींच्या मूळ गावी भाजपला खातेसुद्धा उघडता आलेले नाही. तर मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुरादेवी या गावातही गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. 


धापेवाडा येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या लढतीत काँग्रेस पुरस्कृत सुरेश डोंगरे यांनी भाजप पुरस्कृत संजय शेंडे यांचा पराभव केला आहे. तर पाचगाव येथे काँग्रेसच्या उषा गंगाधर ठाकरे यांनी भाजप पुरस्कृत रजनी लोणारे यांचा पराभव केला. पाचगाव येथे भाजप पुरस्कृत लोणारे यांना गटबाजीचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.