पुणे : जिल्ह्यात तुफान पाऊस झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर पाणी साचले होते. दरम्यान पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे रात्रभर महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पहाटे पाणी ओसरल्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आजच्या नियोजीत सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती देण्यात येतेय. पुण्यातील अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे आजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहराला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे शहारातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी भरलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी भरलं होतं. त्यामुळे इथल्या रस्त्याला नदीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. या परिसरात रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह इतका होता की रस्त्यावर उभ्या अनेक गाड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. 



पुण्यातील सिंहगड रोडवर देखील पावसाचं पाणी साचले होते. यावेळी रस्त्यावर उभ्या दुचाकी पाण्यात वाहून गेल्या. तर पुण्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. कालपासून सुरू असलेल्या पावासमुळे इंदापुरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अनेकांच्या घरामध्येही पाणी शिरलं आहे. इंदापुरात दोन जण गाडीसह पाण्यात वाहून गेले. मात्र वेळीच मदत मिळाल्यामुळे दोघेही बचावले आहेत. तर पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे की पाण्यात अडकलेल्या काही जणांना जेसीबीच्या मदतीनं बाहेर काढण्यात आले. 



शिरुर, अंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसलाय. पावसामुळे शेतातील उभ्या पिकाचं मोठ्या प्रामाणता नुकसान झालं आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी यासारखी पिकं शेतात पाणी भरल्यामुळे खराब झाली आहेत. 


मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणात पाणी वाढले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून ३ हजार ४२० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यानंतर परिस्थितीनुसार हा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. पानशेत धरणातून दोन हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे नदी काठच्या रहिवाश्यांना सतर्कतेच्या सूचना जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 


पिंपरी चिंचवडलाही पावसानं चांगलच झोडपलं आहे. काल संध्याकाळनंतर शहरात पावसाचा जोर वाढला. शहरातील सखल भागात पाणी भरल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी साचलं. तर रस्तेही पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.