धक्कादायक! राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ
कोरोनाच्या रुग्णांमध्ये २४ तासात आजपर्यंतची सर्वाधिक वाढ
मुंबई : महाराष्ट्रामध्ये एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या ९,५१८ ने वाढली आहे. तर २५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. मागच्या लागोपाठ ३ दिवसांमध्ये कोरोनाचे दिवसाला ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले होते, यानंतर आता आज ही संख्या ९,५०० पेक्षा जास्तने वाढली आहे.
आजही मुंबईला मागे टाकून पुण्यात सर्वाधिक रूग्ण वाढले. आज पुण्यात १८१२ तर मुंबईत १०३८ रूग्णसंख्या वाढली. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १,०१,३८८ एवढी आहे. यातले ७१,६८५ रुग्ण बरे झाल्यामुळे घरी गेले आहेत. तर सध्या २३,६९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज दिवसभरात कोरोनामुळे ६४ मृत्यू झाले आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५,७१४ एवढी झाली आहे.
पुण्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५४,६२४ एवढी झाली आहे. यात ३३,६४८ हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १९,५१७ एवढी आहे. आत्तापर्यंत पुण्यात कोरोनामुळे १,३५९ जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ३,१०,४५५ एवढी झाली आहे. यातले १,२८,७३० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, तर आजपर्यंत १,६९,५६९ जणांना पूर्णपणे बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३,९०६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ५४.६२ टक्के एवढा आहे. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे ११,८५४ जणांचा मृत्यू झाला. राज्यातला कोरोना मृत्यूदर हा ३.८२ टक्के एवढा आहे.