Maharashtra Rain Update: मुंबईसह राज्यभरात गेल्या आठवड्यापासून पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. बाप्पाच्या आगमनाबरोबरच राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा यामुळं पावसाचा जोर वाढला आहे. रविवारपासून पुढील तीन दिवसांपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. किनारपट्टीलगतच्या परिसरात व घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढणार असून तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस बरसणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, परभणी आणि धाराशीव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीड, हिंगोलीबरोबरच छत्रपती संभाजीनगर, जालना येथेही मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, घाट माथ्याबरोबरच मुंबई, पुण्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


हवामान विभागानुसार, पुण्याबरोबरच रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातदेखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाडा, विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बाप्पाच्या आगमनाबरोबरच पावसानेही हजेरी लावली आहे. 


जायकवाडी प्रकल्प 94.5% क्षमतेने भरला


जायकवाडी प्रकल्प 94.5% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधुन येणारी आवक बघुन पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात विसर्ग सोडण्याची शक्यता आहे.