Central Railway Alarm Chain Pulling :  मध्य रेल्वे कोणत्याही अनुचित संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहे. एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 या वर्षात मध्य रेल्वेने एकूण 793 व्यक्तींविरुद्ध अवास्तव संकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचे गुन्हे नोंदवले आहेत. तब्बल 2.72 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत मध्य रेल्वेवर, विनाकारण संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे, एकूण 1075 ट्रेन उशीराने धावल्या, म्हणजे मुंबई विभागातील 344 मेल/एक्स्प्रेस गाड्या, भुसावळ विभागात 355 गाड्या, नागपूर विभागात 241 ट्रेन, पुणे विभागात 96 ट्रेन आणि सोलापूर विभागात 39 ट्रेन उशीराने धावल्या. अशा साखळी खेचण्याच्या घटनांमुळे मध्य रेल्वेवर मेल/एक्स्प्रेस ट्रेनचे 8.29 % वक्तशीरपणाचे नुकसान होते. 


केवळ नोव्हेंबर महिन्यात, मध्य रेल्वेवर, साखळी खेचण्याच्या घटनांमुळे, एकूण 197 ट्रेन उशीराने धावल्या आणि रेल्वेचे वेळेपत्रकाचा सरासरी वक्तशीरपणा 10 मिनिटांनी कमी झाला.  मुंबई विभागात 73 मेल/एक्स्प्रेस, भुसावळ विभागात 53, नागपूर विभागात 34, पुणे विभागात 30 आणि सोलापूर विभागात 8 ट्रेन खोळंबल्या. 


मुंबई उपनगरात, संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे दररोज 12 उपनगरीय लोकलना उशीर होतो आणि वक्तशीरपणाचे  16.50% नुकसान होते. कल्याण, दादर, ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कसारा, पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस ही स्थानके आणि आंबिवली – टिटवाळा विभाग स्थानकांवर आणि विभागांवर साखळी खेचण्याच्या घटना वारंवार येतात. 


रेल्वेने प्रत्येक उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस  ट्रेनमध्ये संकटकालीन साखळी खेचण्याचा (Alarm Chain Pulling) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. उशिरा पोहोचणे, मध्यवर्ती स्थानकांवर चढ-उतार करणे इत्यादी अनावश्यक कारणांसाठी प्रवासी संकटकालीन साखळी खेचण्याचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे.


ट्रेनमधील साखळी खेचण्याच्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या धावण्यावरच परिणाम होत नाही तर पाठीमागून येणाऱ्या ट्रेनवरहीही मोठा परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय चलन प्रणालीमध्ये अशा घटनांमुळे मेल/एक्स्प्रेस व उपनगरीय रेल्वे उशिराने धावतात आणि त्यांच्या वक्तशीरपणाला बाधा येते. पुढे एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी साखळी खेचण्याच्या गैरवापराने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.


अनावश्यक आणि स्व सोईच्या गैर कारणांसाठी संकटकालीन साखळीचा अवलंब करू नका ज्यामुळे इतरांची गैरसोय होईल. अनावश्‍यक परिस्थितीत साखळी खेचण्याच्या कार्याकडे जाणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय अपराध आहे.  ह्यासाठी एक वर्षापर्यंत कारावास आणि दंड किंवा दोन्ही ठोठावले जातील यामुळे याचा गैरवापर करु नये असे मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन आहे.


मुंबई विभागात, वारंवार साखळी खेचण्याच्या घटनांमुळे 'या' ट्रेन प्रभावित होतात


पनवेल - गोरखपूर एक्सप्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्सप्रेस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा मेल (मार्गे - अलाहाबाद)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा मेल (नागपूर मार्गे)
 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लखनऊ पुष्पक एक्सप्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्सप्रेस