जावेद मुलाणी, झी मी़डिया, बारामती  : बारामती... देशाच्या राजकारणात या मतदारसंघाची ओळख राजकीय पंढरी अशी आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार यांच्या बारामतीकडं देशाचे  विशेष लक्ष असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही बारामतीच्या विकास मॉडेलचं कौतुक केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा, खरं तर पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणजे बारामती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचं हे गाव.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करणं प्रचंड अवघड... त्यातच पवारांची कन्या सुप्रिया सुळे या इथल्या खासदार... २०१४ साली काँग्रेस-राष्ट्रवादीचे भलेभले नेते मोदी लाटेमध्ये वाहून गेले... मात्र बारामतीचा राष्ट्रवादीचा किल्ला अभेद्य राहिला... 


या निवडणुकीत सुळे यांना ५ लाख २१ हजार ५६२ मतं मिळाली... तर शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मतं पडली... 



धनगर समाजाच्या  आरक्षणाचा मुद्द्यावर २०१४ची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती... या निवडणुकीत जानकरांनी आपल्या कपबशी चिन्हाचा हट्ट  सोडून कमळाच्या  चिन्हावर निवडणूक लढवली असती, तर कदाचित मोदी लाटेत पवारांच्या वर्चस्वाला धक्का देणं त्यांना शक्य झालं असतं... याच मताच्या आकडयावरच जानकर यांना विधानपरिषदेवर घेऊन  राज्याचे दुग्ध आणि पशुसंवर्धन कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय.  आगामी निवडणुकीतही जानकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे... 


२०१४च्या विधानसभेत सर्व पक्ष स्वतंत्र लढले... असं असताना तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मतदारसंघात बिलकुल प्रचार न करता सहज निवडून आले... त्यांनी राज्यात आपल्या पक्षाच्या अन्य उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती... असं असताना


बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांना १ लाख ५० हजार ५८८ मतं मिळाली तर भाजपाचे बाळासाहेब गावडे यांना केवळ ६० हजार ७९७ मतांवर समाधानी राहावं लागलं. 


इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी कॉग्रेसचे  माजी  मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला... 


तर पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे विजयी झाली. त्यांनी काँग्रेसच्या संजय जगताप यांचा सुमारे ९ हजार मतांनी पराभव केला... 


दौंडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे राहुल कुल यांनी राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांचा पराभव केला... 


भोर विधानसभा मतदारसंघात  कॉग्रेसचे संग्राम थोपटे यांनी शिवसेनेच्या कुलदीप कोंडेंचा १९ हजार मतांनी पराभव केला. इथं राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड तिसऱ्या स्थानी राहिले.  


बारामतीमधला सहावा विधानसभा मतदारसंघ खडकवासला हा भाजपाच्या ताब्यात आहे. इथून भीमराव तापकिर यांनी राष्ट्रवादीचे दिलीप बराटे यांचा पराभव केला... 


बारामतीमधल्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्या तरी  पवारांचं निवासस्थान असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि  ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे बारामतीमध्ये संथपणे का होईना, पण भाजपा हातपाय पसरत असल्याचं दिसतंय.  इंदापूर तालुक्यात पंचायत समिती नगरपालिका दोन साखर कारखाने काँग्रेसच्या ताब्यात असून बाजार समिती, एक साखर कारखाना आणि जिल्हा परिषदेचे सात पैंकी चार सदस्य राष्ट्रवादीचे आहेत.


पुरंदर तालुक्यात पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे तर नगरपालिका कॉग्रेसकडे आहे. दौंड तालुक्यात आमदार राहुल कुल यांच्याकडे केवळ भिमा पाटस सहकारी साखर कारखाना आहे... बाकी सर्वत्र राष्ट्रवादीची मजबूत  पकड आहे. भोर तालुक्यात कॉग्रेसचं वर्चस्व कायम आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादीकडे सहापैकी केवळ २ आमदार आहेत... तर काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि रासपाकडे प्रत्येकी एक आमदार आहे... 


पवारांच्या बारामती मॉडेलचं अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील कौतूक करतात... मात्र आता मतदारसंघाच्या खुंटलेल्या विकासाला सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा दावा खासदार सुळे यांनी केला आहे. 


बारामती म्हणजे पवार असं गेल्या अनेक वर्षांचं समीकरण. गेल्या निवडणुकीत महादेव जानकरांनी याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला... मात्र आता मोदीलाट ओसरली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत आणि शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे.