प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगडच्या (Raigad) इरसालवाडीत ( Irshalwadi landslide) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनं सर्वांना सुन्न करुन टाकलं आहे. इरसालवाडीत दरड कोसळल्यानंतर गेल्या तीन दिवसापासून बचाव कार्य सुरू आहे. गेल्या 72 तासांपासून एनडीआरएफचे (NDRF) पथक मातीचे ढिगारे हटवण्याचे काम करत आहेत. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अद्यापही 78 लोक बेपत्ता आहेत. त्यामुळे तीन दिवसांनंतरही बेपत्ता लोक जीवंत असतील की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खालापूर तालुक्यातील इरसाल वाडी येथील मदत आणि बचाव कार्य आजही सुरूच राहणार आहे. दरम्यान परिस्थिती पाहून आज संध्याकाळपर्यंत हे काम कायमचे थांबवले जाण्याची शक्यता आहे. बचाव यंत्रणांनी शनिवारी संध्याकाळपर्यंत 27 मृतदेह शोधून काढले होते. तर 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे. प्रशासनाच्या माहिती नुसार अद्याप 78 जण बेपत्ता आहेत. सध्या या ठिकाणी कोसळत असलेला पावसामुळे मदत कार्यात बरेच अडथळे येत आहेत. त्यामुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन बचाव कार्य थांबवण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच तळीये प्रमाणे इथं देखील बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित केले जाण्याची शक्यता आहे.


"शनिवारी देखील सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मृतांची संख्या 27 झाली आहे. वाडीतील 98 लोकांना छावणीत ठेवण्यात आले आहे. वाडीतील 16 जण नातेवाईकांच्या घरी गेले आहेत तर 78 जण अद्याप बेपत्ता आहेत. या गावाची लोकसंख्या 229 होती. आता या मदत व बचावाबाबतचा निर्णय झाला तर तो सोमवारी घेतला जाईल," असे मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.


एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट दीपक तिवारी यांनी सांगितले की, "दोन दिवसांपासून येथील हवामान खूपच खराब आहे. बचाव कार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मोहिमेसंदर्भात कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनच घेणार आहे. 72 तासांनंतर एकदा मोहिम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे."


जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेहही कुजण्यास सुरुवात झाली आहे. आता लोकांना जिवंत बाहेर काढण्याची आशा नाही. तरीही जनतेच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. जिल्हा प्रशासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अहवाल पाठवणार आहे. कदाचित सोमवारपर्यंत निर्णय होईल. ज्यांचे नातेवाईक बेपत्ता आहेत ते अजूनही आशा बाळगून आहेत. दरम्यान, प्रशासनाने 6 भूस्खलन प्रवण गावातील 147 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले आहे."