कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीतही नाव न आल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
महाविकासआघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता.
जालना: सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या यादीतही नाव न आल्यामुळे निराश होऊन जालन्यातील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भोकरदनच्या वरुड गावात ही घटना घडली. या गावातील गजानन वाघ यांच्यावर १ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज होते. तर त्यांच्या पत्नीच्या नावावरही ५५ कर्ज होते. याशिवाय, वाघ यांच्या आईच्या नावावरही ग्रामीण बँकेचे तब्बल दीड लाखांचे कर्ज आहे.
महाविकासआघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. २४ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर झाली होती. यानंतर २९ फेब्रुवारीला कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची दुसरी यादी जाहीर झाली होती. यामध्ये तब्बल २२ लाख शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र, या यादीत आपले नाव न आल्यामुळे गजानन वाघ नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले. यामुळे त्यांनी आत्महत्या केली.
'या' गतीने कर्जमाफीसाठी ४६० महिने लागतील; फडणवीसांचा सरकारला टोला
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे वाघ यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. कर्जमाफी झाल्यावर हा बोजा कमी होईल, असे वाघ यांना वाटत होते. मात्र, दुसऱ्या यादीतही नाव आल्यामुळे गजानन वाघ प्रचंड निराश झाले. याच नैराश्याच्या भरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीसाठी ३६.४५ लाख खाती निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी ३४.९८ लाख खाती पोर्टलवर अपलोड झाली आहेत. उर्वरित खात्यांची माहिती संकलित करण्याचे काम अजूनही सुरु आहे. मात्र, मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले होते.