Shivaji Maharaj Wagh Nakh:  अफजल खान वधावेळी शिवाजी महाराजांनी वापरलेली हीच वाघनखं असल्याबाबत अनिश्चितता आहे असं स्पष्टीकरण विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिले आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांनी पत्रव्यवहार केला होता. त्यावरून ही माहिती समोर आलीय असा दावा इंद्रजीत सावंतांनी केला. महाराष्ट्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखं आणत असल्याचा दावा केलाय. मात्र, प्रत्यक्षात आणली जाणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच्या वधा वेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण लंडन स्थित विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना केलेल्या पत्र व्यवहारात विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने हे स्पष्टीकरण दिलंय. वाघनखांचा वाद पेटणार आहे. यावर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. वाघनखांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाड संतापले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर टीका


अफझलखानाचे पोट फाडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही आणणार, असा गाजावाजा या सरकारने केला होता. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत, असा दावाही केला होता. त्याचवेळेस आम्ही सांगितले होते की, त्या वाघनखांची खरी माहिती कोणालाच नाही. त्यामुळे  छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली हीच वाघनखे आहेत, असे म्हणता येणार नाही. पण, भावनिक राजकारण करून लोकांना आपल्याकडे वळविण्याची सवय असल्याने 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरली होती', अशी घोषणा सरकारनेच करून टाकली. आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या व्यवस्थापनाने पत्र लिहून, ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा इतिहासकार इंद्रजित सावंत यांना कळविले आहे की, " म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही अन् तसे आम्ही कधी सांगितलेलेही नाही." म्हणजेच भावनिक राजकारण करता करता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्रास्रांविषयी खोटी माहिती महाराष्ट्रातील तमाम श्रद्धाळू लोकांपर्यंत पोहचवित आहेत.  कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांशी तरी राजकारण करू नका ! अशा शद्बात  जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 


सरकारने वाघनखांबाबत संभ्रम दूर करावा...म्युझिअम या वाघनखांबाबत पुरावे नसल्याचं म्हणतंय. मग एवढे दिवस 'वाघनखं महाराजांचीच' हे कोणत्या आधारावर सरकार सांगत होतं?... असा सवाल सचिन अहिर यांनी सरकारला केला आहे. 
वाघनखांवरून काँग्रेस नेत्यांची सरकारवर जोरदार टीका केलीय...वाघनखांबाबत सरकार घोर फसवणूक करतंय अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केलीय...तर राज्याच्या जनतेचे पैसे लुटण्याचं काम सरकार करत असल्याचं पटोलेंनी म्हटलंय. तर खोटं बोलणा-यांना जनता माफ करणार नाही, असा हल्लाबोल भाई जगताप यांनी केला आहे. 


दरम्यान, वाघनखं आणण्याआधी खात्री करूनच निर्णय घेतला असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. मात्र इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा वेगळा दावा असेल तर त्यांबद्दल आमचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची शंका दूर करतील असं वक्तव्य शंभुराज देसाई यांनी केलंय.