आई-वडिलांनी १५ वर्षांच्या मुलीचं लग्न लावून दिलं, कोल्हापुरातील घटना उघड
मुलीची आई म्हणते, `आमच्या समाजात बारा वर्षांच्या मुलींचीदेखील लग्न होतात`
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : पुण्यातील कंजारभाट समाजातील एका मुलीची कौमार्य चाचणी घेतली गेली असल्याची बातमी ताजी असतानाच आता कोल्हापूर शहरात कंजारभाट समाजातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलय. कंजारभाट समाजात असणाऱ्या अनिष्ठ रुढी परंपरेमुळं या समाजातील मुलींवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याच वारंवार समोर येतंय. जातपंचायतीनंतर आता तर या समाजात अल्पवयीन मुलीचं लग्न लावल्याचं उघड झालंय. लग्नपत्रिका आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावरुन हा धक्कादायक प्रकार उघड झालाय.
काही सामाजिक कार्यकर्त्यांना बालविवाहाची कूणकूण लागताच त्यांनी बालकल्याण संकुल आणि पोलिसांशी संपर्क करुन या प्रकरणाचा भांडाफोड केला... मुलीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर १२ जून २००३ अशी जन्मतारीख आहे, असं असताना मुलीच्या कुटुंबीयांनी तिला १८ वर्षे पूर्ण झाल्याचा दावा केला.
अधिक वाचा :- जातपंचायतीच्या दबावाला बळी पडून लंडनशिक्षित वराकडून वधुची 'कौमार्य चाचणी'
हे प्रकरण पोलिसांपर्यत गेल्यानंतर हा विवाह थांबेल असं वाटलं.. पण मुलीच्या नातेवाईकांनी मुलीला १८ वर्ष पूर्ण झाल्याचं खोटं सांगून घरी नेलं... कुटुंबीयांनी हा विवाह सोहळा पूर्ण केल्याचं कळताच कोल्हापूर बालकल्याण संकुल समितीने मुलीला आपल्या ताब्यात ठेवलं यावर 'मुलीचं लग्नच झालेलं नाही, मग तिला बालकल्याण संकुलात का ठेवलं?' असा उलट जाब विचारण्यासाठी कंजारभाट समाजातील अनेक जण बालसंकुलाच्या परिसरात दाखल झाले. यावेळी मुलीच्या आईनं तर चक्क आमच्या समाजात बारा वर्षांच्या मुलींचीदेखील लग्न होत असल्याचे सांगून मुलीचा विवाह झाल्याचा निर्वाळाच दिला.
कंजारभाट समाजातील या अनिष्ट रुढी मुलींच्या जीवावर उठणाऱ्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर त्या बंद करणं गरजेचं आहे.