प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: कोल्हापूर परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्यावर्षीप्रमाणे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये महापूर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला. रमेश जारकीहोळी यांनी शिरोळ तालुक्यातील नदी परिसराची पाहणी केली. यावेळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हेदेखील उपस्थित होते. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन्ही नेत्यांमध्ये पूरपरिस्थितीबाबतच्या उपाययोजनांविषयी चर्चा झाली. यावेळी रमेश जारकीहोळी यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये समन्वय राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच महापुरामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील नदीकाठच्या ग्रामस्थांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी दोन्ही राज्यातील पाटबंधारे विभागाच्या  अधिकाऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याची सूचना जारकीहोळी यांनी केली. 

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली होती. यानंतर राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता. यानंतर पुराचे पाणी नदीकाठच्या परिसरात शिरले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच जास्त धोका असलेल्या गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रियाही सुरु झाली होती. याशिवाय, आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूरात आपत्ती निवारण पथकाच्या NDRF चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर सांगलीच्या वारणा धरण क्षेत्रातही सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शनिवारी वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. सध्या ८५०० क्युसेक्स विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.