Crime News : बार रात्री उशीरापर्यंत सुरु ठेव! पोलीस कर्मचाऱ्याचा साथीदारांसह धुडगूस
रिव्हॉल्व्हर टेबलवर ठेवत त्यांनी बार मॅनेजरला धमकी दिली
आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बार रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवण्यासाठी बारच्या मॅनेजरला धमकी दिल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे धमकी देणऱ्यांमध्ये एक पोलीस कर्मचारीही होता. कल्याणमधल्या ताल बारमध्ये काल या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सहा साथीदारांसह धिंगाणा घातला. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
टिटवाळा इथं राहणारा शेखर सरनोबत काल संध्याकाळी आपल्या काही मित्रांसोबत कल्याण इथल्या ताल बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता. शेखर सोबत त्याचा पोलीस मित्र उत्तम घोडे, मंगल सिंग चौहान, रिकीन गज्जर ,हरिश्याम सिंह, विक्रांत बेलेकर होते. घोडे हा पोलीस कर्मचारी टिटवाळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
रात्री नऊ वाजता बार बंद झाला मात्र त्यानंतर या सहा जणांनी मद्यधुंद अवस्थेत गाणी सुरू ठेवा अशी मागणी करत धिंगाणा घातला. बार मॅनेजरने याला नकार देताच हरीश्याम सिंग याने आपल्या जवळची रिव्हॉल्व्हर टेबलावर ठेवत बार मॅनेजरला धमकी दिली. गाणं सुरु करणार नाही तर आम्ही बिल भरणार नाही अशी धमकी देत त्यांनी धिंगाणा घातला.
याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व आरोपींना ताब्यात घेतलं. आज या 6 जणांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.