चक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद
Khalapur Irshalwadi Landslide: इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक राहतात. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत...ढिगा-याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजताच घटनास्थळी पोहोचले.
Khalapur Irshalwadi Landslide: रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इरसालवाडी (Irshawadi Landslide) इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे डोंगर चढून स्वत: घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहचुन त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्याचा (Resque) आढावा घेतला आणि पीडितांशी संवाद साधला. या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी मीडियाला दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थनिक नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 'एनडीआरएफ' (NDRF) पथकाच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग देण्यासाठी काही तरुण स्वतःहून पुढे आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, मौजे चौक आणि मौजे वरोसे इथले ग्रामस्थ, विविध विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसह एमआयडीसी मध्ये काम करणारे पाचशेहून अधिक मजूर या मदतकार्यात स्वतःहून सहभागी झाले आहेत. याशिवाय जखमींवर उपचार करण्यासाठी तसेच लोकांचे गडाच्या पायथ्याशी तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी रत्नागिरीहुन 10 कंटेनर देखील मागवण्यात आले आहेत. गावकऱ्यांनी स्वतःहून दुर्घटनाग्रस्त गावातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला असून जेवण, पिण्याचे पाणी आणि इतर सामुग्री पाठवण्याची व्यवस्था केली आहे.
मुख्यमंत्री साडेसात वाजल्यापासून घटनास्थळी
मुख्यमंत्री सकाळी सव्वा सात वाजल्यापासूनच इरसालवाडीत पोहोचले होते. मात्र त्यावेळी डोंगरावर चढून जाऊन शक्य नसल्यानं मुख्यमंत्री पायथ्याशी थांबले होते. पाऊस थांबल्यानंतर एकनाथ शिंदे पायवाटेनं डोंगर चढून गेले..... इथेच प्रत्यक्ष दरड कोसळून गाव डोंगराखाली गाडलं गेलंय. या ठिकाणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मध्यरात्री साडे तीन वाजल्यापासून उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांनी डोंगरावर पोहोचल्यावर गिरीश महाजन यांच्याकडून अधिक माहिती घेतली. या दुर्घटनेत अनेक कुटुंबं उध्वस्त झालीयत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पीडितांची भेट घेतली. त्यांना धीर दिला. सांत्वन केलं. सकाळी सव्वा सात वाजता मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले होते. ज्या ठिकाणी पीडितांना आसरा देण्यात आलाय. तिथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाशी संवाद साधला. आवश्यक ती सगळी मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीय.
पीडितांच्या अश्रुंचा बांध फुटला
इरसालवाडीत कुणाचा मुलगा ,कुणाची सून ,कुणाची आई ढिगा-याखाली अडकली आहे... इरसालवाडी गाव राहिलं नाही तर आता फक्त मातीचा ढिगारा राहिला आहे... या घटनेतून सुदैवाने बचावलेल्या घुमी पारधी या महिलेचा प्रत्यक्ष घटना सांगताना अश्रूंचा बांधही फुटला..
फडणवीसांकडून शोक व्यक्त
इरसालवाडीतली दुर्घटना ही अतिशय दुर्देवी असून, मृतांबद्दल फडणवीसांनी शोक व्यक्त केलाय. गाव डोंगरावर असल्याने यंत्रसामुग्री नेता येत नाहीये. बचाव पथकाकडून हाताने ढिगारा उपसण्याचं काम सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी दिलीय. तर पाऊस आणि हवामान खराब असल्याने दुर्घटनास्थळी हेलिकॉप्टर, पोकलेन नेण्यास अडथळा येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय.
विरोधकही पोहोचले घटनास्थळी
ईरसालवाडी दुर्घटनास्थळी आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना आमदार अनिल परब आणि सुनील प्रभू यांनी भेट दिलीय. हे का घडलं, यावर नंतर चर्चा होत राहील, आता मदत मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीय.