Konkan Railway booking for Ganpati festival : आता गणपतीनिमित्त चाकरमान्यांना कोकणात जायचे असेल तर 4 महिन्याआधीच रेल्वे बुकिंग करता येणार आहे. 16 मेपासून रेल्वेचे बुकिंग सुरू होणार आहे. यंदा गणपतीचे आगमन 19 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे 120 दिवस आधीच कोकणवायीयांना गाड्यांचे बुकिंग करता येणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे गेल्या वर्षीही कोकणवायीयांना गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र यावेळी कुठलीही बंधनं आणि मर्यादा नसल्यानं कोकणात यंदा पूर्वीप्रमाणेच उत्सव साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने मोठी तयारी सुरू केलीय. तसेच उन्हाळी सुट्टीमुळे रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता 26 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. आजपासून याचे आरक्षण करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सव म्हटला की कोकणवासीय गावाला जाण्यास प्राधान्य देतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील लाखो चाकरमानी आपल्या कुटुंबकबिल्यासह गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होतात. त्यासाठी ते कोकण रेल्वेलाच प्राधान्य देतात. रेल्वेचे बुकिंग कधी सुरु होणार याचे वेध लागतात. यंदा गणपतीचे आगमन मंगळवार, 19 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे त्याच्या आधी 120 दिवस रेल्वे गाडयांचे बुकिंग सुरु होणार असल्याचे रेल्वे कडून सांगण्यात आले आहे.


मध्य रेल्वेकडून कोकण विभागासाठी विशेष गाड्या 


सुट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविंम (गोवा) दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.  मध्य रेल्वेने याआधीच 916 उन्हाळी विशेष चालवण्याची घोषणा केली आहे आणि या अतिरिक्त उन्हाळी विशेषसह या वर्षी एकूण उन्हाळी स्पेशलची संख्या 942 होईल. 26 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.


01129 Special दि. 6.5.2023 ते 3.6.2023 पर्यंत दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22.15 वाजता सुटेल आणि थिविंम येथे दुसऱ्या दिवशी 11.30 वाजता पोहोचेल.


01130 Special दि.7.5.2023 ते 4.6.2023 पर्यंत दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी थिवि येथून 16.40  वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 4.5 वाजता पोहोचेल.


असे असणार थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.


कोचची व्यवस्था  : एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय, 10 शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 4 सामान्य द्वितीय श्रेणी. 


आरक्षण आजपासून सुरु झाले आहे.  Special गाडी क्रमांक 01129/01130 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. 4.5.2023 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु झाले आहे. अधिक माहितीसाठी तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा, असे आवाहन करण्यात आले आहे.