Kokan Railway Latest News: कोकण रेल्वेने एक महत्त्वाची योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने त्यांच्या प्रस्तावित रेंट अ बाइक ही योजना बुधवारी रद्द केली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या उप महाप्रबंधक बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही योजना रद्द करण्यात आली आहे. कारण या योजनेला स्थानिकांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळं आम्ही गोव्यात दुचाकी भाड्यांने देण्याच्या या योजनेसाठी जारी केलेल्या निविदा रद्द केल्या आहेत. (Kokan Railway)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी कोकण रेल्वेच्या या योजनेला सुरुवातीपासूनच विरोध केला होता. या योजनेमुळं स्थानिक लोकांचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. हा प्रादेशिक अस्मितेचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीपासूनच आम्ही विरोध केला होता. जेव्हा मला कोकण रेल्वे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात प्रवेश करत असल्याचे आणि येथील पारंपारिक व्यवसायांना याचा फटका बसू शतो हे जाणवले तेव्हा मी याचा कडाडून विरोध केला होता, असं आमदार सरदेसाई यांनी सांगितलं आहे. 


गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या प्रकरणी लक्ष घातले होते. कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ही निविदा रद्द करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या या योजनेला आपचे आमदार वेन्झी व्हिएगस दक्षिण तसेच उत्तर गोव्यातील रेन्ट अ बाइक असोसिएशनने विरोध केला होता. 


सरदेसाई यांनी म्हटलं आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक सिद्धांत आहे. सरकारचा व्यवसायाशी काहीच घेणे-देणे नाहीये. त्यामुळं कोकण रेल्वेने वेळेवर ट्रेन सोडण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी पर्यटनाच्या व्यवसायात येऊ नये. कोकण रेल्वेची जबाबदारी परिवहन उपलब्ध करुन देणे आहे. रेल्वे वेळेवर चालवणे ही आहे. मात्र, बाइक व कार रेंटने देण्याच्या व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. गोव्यातील स्थानिक सुरुवातीपासूनच हा व्यवसाय करत आहेत.'


काय होती ही सेवा?


गोव्यातील मडगाव, थिवी, करमळी, काणकोण तसेच कर्नाटकातील कारवार, गोकर्ण रोड व कुमठा रेल्वे स्थानकावर ही सेवा सुरू करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला होता. त्यासाठी 18 जूनला निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती. मात्र, आता विरोधानंतर ही निविदा रद्द करण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे.