प्रशांत अंकुशराव, मुंबई, विशाल करोळे, औरंगाबाद : जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवाच मिळत आहेत. तळीरामांची मात्र या लॉकडाऊनमुळे चांगलीच गोची झाली आहे. दारूसाठी या तळीरामांची तळमळ एवढी वाढली की त्यांनी चक्क दारूची दुकानंच फोडली आहेत. एवढच नाही तर डॉक्टरांकडून दारूची चिठ्ठी लिहून घेण्यासाठीही त्यांची धडपड सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनच्या या काळात तळीराम सगळ्यात अस्वस्थ आहेत. दारू मिळवण्यासाठी त्यांच्याकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी दारूचं दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या कुर्ला भागात दारूचं गोडाऊन फोडलं आहे. या गोडाऊनमधून दारूचे ११ बॉक्स लांबवण्यात आले. या ४ आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींकडून संपूर्ण माल जमा करण्यात आला आहे.


लॉकडाऊनमध्ये दारू मिळवण्याचे सगळे मार्ग बंद झाल्यानंतर काहींनी तर डॉक्टरांकडून चिठ्ठी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अस्वस्थ वाटतंय आणि घबराट होतेय, असं सांगत काही जणं मानसोपचार तज्ज्ञांना फोन करत आहेत. मागची २ वर्ष जे दारू घेत होते, त्यांच्यामध्ये याचं प्रमाण जास्त आहे, असं मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं आहे. हे लोकं दारू मिळवण्यासाठी प्रिस्क्रिप्शन देण्याची मागणी डॉक्टरांकडे करत आहेत. 


दारूसारखं व्यसन सुटण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनसारखा चांगला काळ नाही. त्यामुळे दारू सोडण्यासाठी लॉकडाऊनच्या निमित्ताने आलेली संधी गमावू नका.