मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, कवी, शिक्षक आणि दलित लेखक माधव गुणाजी कोंडविलकर यांचे काल रात्री निधन झाले. गेले तीन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.  माधव कोंडविलकर यांचे  'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' हे पुस्तक खूपच गाजले होते. कोंडविलकर यांचे दैनंदिनीवजा आत्मकथन म्हणून हे पुस्तक ओळखले जाते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिलीत. अजून उजाडायचं आहे, आता उजाडेल!, भूमिपुत्र अशी त्यांची काही पुस्तके गाजलीत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ ही त्यांची गाजलेली कादंबरी होय. याच कादंबरीवरून नाटक झाले होते, तसेच १९८५मध्ये कादंबरीचा फ्रेंच भाषेत अनुवाद झाला होता. १९९२ आणि २००१ मध्ये कादंबरीचा हिंदी अनुवादही झाला होता. मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे ही कादंबरी त्यांच्या रोजनिशीवर आधारित आहे. ती प्रथम १९७७ मध्ये तन्मय दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९७९ साली पत्नी सौ. उषा कोंडविलकर यांनी कन्या ग्लोरियाच्या नावाने ती स्वतंत्रपणे प्रकाशित केली. या कादंबरीची १९८७ मध्ये दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.


१५ जुलै १९४१ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म मौजे देवाचे गोठणे (सोगमवाडी) या खेड्यात झाला. माधव कोंडविलकर हे रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरात राहत होते. नंतर ते आपले जावई देवदास देवरूखकर यांच्याकडे रत्नागिरीत राहायला गेले. ते गेले काही दिवस आजारी होते. त्यांना रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कोविड-१९ पॉझिटिव्ह होते. कोंडविलकर यांनी कविता, कथा, कादंबरी, आत्मकथन या प्रकारातून त्यांनी दलित, पीडित व उपेक्षित समूहाच्या व्यथा, वेदना व्यक्त केल्या आहेत. माधव कोंडविलकर यांच्यावर भगवान बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. 



कोकणातील खोत आणि कुळवाडी यांच्याकडून दलित, कष्टकऱ्यांचे शोषण केले जात होते. कोकणातील या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीतून कोंडविलकरांचे मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे  हे आत्मकथन आकाराला आले आहे.


त्यांनी आपल्या साहित्यातून पिढ्यानपिढ्या जातिभेदाच्या भिंतीत अडकलेल्या आणि भिंती तोडून मुक्त होऊ इच्छिणार्‍या दलित, कष्टकरी, श्रमिक वर्गाचे दु:ख मांडण्याचा प्रयत्न केला. मुंबई व कोकणातील दलित व कामगार वर्गाची होरपळ कोंडविलकरांनी आपल्या साहित्यातून त्यांनी तीव्रपणे मांडलेली आहे. कोंडविलकर यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, नातू असा परिवार आहे.


कोंडविलकर यांची पुस्तके


अजून उजाडायचं आहे (कादंबरी)
आता उजाडेल ! (कादंबरी)
एक होती कातळवाडी (कादंबरी)
घालीन लोटांगण (धार्मिक)
डाळं (कादंबरी)
देवांचा प्रिय प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक (ऐतिहासिक)
निर्मळ (कादंबरी)
भूमिपुत्र (कादंबरी)
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे (दलित साहित्य)
स्वामी स्वरूपानंद (आध्यात्मिक)
हाताची घडी तोंडावर बोट (कादंबरी)