शाळकरी चिमुकली चालवतेय स्कूटी! छत्रपती संभाजी नगरमधील धक्कादायक Video Viral
Little Girl Rides Scooter Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरमधील असल्याचं सांगितलं जात आहे.
Little Girl Rides Scooter Viral Video: वाहन चालवण्यासाठी समजदारपणा ही मूलभूत गरज आहे. कारण वाहन चालवताना संतुलन आणि जबाबदारीची जाणीव असणं हे चालकाबरोबरच रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं असतं. याच कारणामुळे जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वाहन परवाना म्हणजेच लायसन्स देण्यासाठी काही ठराविक मयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालवणारी व्यक्ती समजदार असेल आणि ती योग्य पद्धतीने वाहन चालवेल असं वयाचं बंधन घालून आश्वस्त करण्याचा प्रयत्न असतो. मात्र अनेकदा अल्पवयीन मुलं मुली वाहन चालवताना दिसतात. अगदी पुण्यात झालेला पोर्शे कारचा अपघात असो किंवा इतरही अनेक अपघातांमध्ये अल्पवयीन मुलं बेदरकारपणे गाड्या चालवताना दिसतात. यामधूनच अपघात होतात आणि रस्त्यावरुन चालणाऱ्यांचा जीवही धोक्यात येतो. केवळ चारचाकीच नाही तर दुचाकीवरही असे धक्कादायक प्रकार पाहायला मिळतात. सध्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून तो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
कोणी शेअर केला आहे हा व्हिडीओ आणि त्यात आहे काय?
'औरंगाबाद इनसायडर' नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओला, 'छत्रपती संभाजी नगरमधील धक्कादायक दृष्यं' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये पिवळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाचा कोट घातलेली आणि साधे जमीनीपर्यंत पाय पोहचत नसलेली चिमुकली दुचाकी चालवताना दिसत आहे.
दोघांनीही हेल्मेट घातलेलं नाही
या चिमुकलीचे वडील तिच्या मागे बसलेले दिसत आहेत. या स्कूटीचं हॅण्डल या चिमुकलीच्या हातात असून वडील मागे निवांत बसल्याचं दिसत आहे. दोघांनाही हेल्मेट परिधान केलेलं नाही. हा व्हिडीओ तुम्हीच पाहा...
अनेकांनी व्यक्त केला संताप; म्हणाले या अशा वागणुकीमुळेच होतात अपघात
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. "या प्रकरणात मुलीवर संताप व्यक्त करु नका. पालकांनीच शहाणपण दाखवणं गरजेचं आहे," असं एकाने म्हटलं आहे. अन्य एकाने, "यामुळेच अनेक अपघात होतात. हे कोणत्या पद्धतीचं पालकत्व असून यातून ते मुलीला काय शिकवू पाहतात हा मोठा प्रश्नच आहे," असं म्हटलं आहे. तिसऱ्या व्यक्तीने, "हेल्मेट कुठे आहे? ना स्वत: हेल्मेट घातलं आहे ना मुलीला घातलं आहे," असं म्हणत अनेक नियम मोडल्याचं अधोरेखित केलं आहे.