सांगली : काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेस पक्षाशी नातं तोडल्याचं प्रतीक पाटील यांनी जाहीर केलं आहे. वसंतदादांचं नाव हाच पक्ष असल्याचं प्रतीक पाटील यांनी म्हटलं आहे. काँग्रेसनं लोकसभेचं तिकीट दिलं नाही तर, अपक्ष लढा असा मंत्रही त्यांनी भाऊ विशाल पाटील यांना दिला आहे. आताची काँग्रेस, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींची राहिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सांगलीची काँग्रेसची जागा डावलण्यात आली आहे. खासदार असताना मी कुठेही कमी पडलो नाही. विरोधक असणाऱ्या भाजपला लक्ष्य करण्यातही आम्ही कमी पडलो नाही. मोदी लाटेमुळे फक्त एक निवडणूक हरलो, पण संपूर्ण भारतात हेच चित्र होतं. आघाडीमध्ये असलेल्या पक्षाकडून आणि पक्षांतर्गतही विरोध झाला, पक्षामध्येच राजकारण झालं, तरी काँग्रेसची ही जागा आम्ही जिंकलेली आहे. यासाठीच मला मंत्रीपद मिळालं,' असं प्रतीक पाटील म्हणाले.


'आता सांगलीमध्ये काँग्रेस कमजोर आहे, काँग्रेस संपली आहे, अशी चर्चा व्हायला लागली आणि मग राजू शेट्टींना ही जागा द्यायची भूमिका काँग्रेसकडून मांडण्यात आली. ही जागा मिळाल्यावर राजू शेट्टींनी फोन केला आणि तुम्हाला घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही. राजू शेट्टींना कळतं, पण आमच्या पक्षाला कळत नाही,' अशी खंत प्रतीक पाटील यांनी व्यक्त केली.


'काँग्रेस पक्षाला याबद्दल कळवायचा प्रयत्न केला, नेत्यांना भेटायचाही प्रयत्न केला. पण त्यांना वसंतदादा नको आहेत, त्यांचे विचार नको आहेत हे त्यांच्या भूमिकेवरून दिसलं', अशी टीका प्रतीक पाटील यांनी केली.