1 नाही 2 बंडखोरांना समजावण्याचं `मविआ`समोर लक्ष्य! उरले फक्त काही तास; काँग्रेसचा ठाकरेंवर दबाव
Loksabha Election 2024 Last Day To Withdrawal of Candidate Application: एकीकडे नितीन गडकरींविरुद्ध किती उमेदवार असणार हे आज स्पष्ट होणार असतानाच दुसरीकडे रामटेकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाही दिसत आहे.
Loksabha Election 2024 Last Day To Withdrawal of Candidate Application: विदर्भामधील पाच मतदारसंघांमध्ये होऊ घातलेल्या आगामी लोकसभा निवडणुकींसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. विशेष म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असून यासाठी अवघे काही तास उरलेले असताना महाविकास आघाडीसमोर एक नाही तर 2 बंडं मोडून काढण्याचं आव्हान आहे. तसेच आज केंद्रीय मंत्री आणि नागपूरमधील भाजपाचे उमेदवार नितीन गडकरींसमोर किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील हे ही स्पष्ट होणार आहे. (लोकसभा निवडणुकीसंदर्भात 30 मार्चला घडलेल्या राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
नितीन गडकरींविरुद्ध 26 उमेदवार?
नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या 5 मतदारसंघांमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्रामधील पहिल्या टप्प्यातील मतदान या 5 मतदारसंघांमध्ये होणार आहे. या ठिकाणी 19 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या पाचही लोकसभा मतदारसंघात किती उमेदवार प्रत्यक्षात रिंगणातत राहतात याचे चित्र आज दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. खास करुन नागपूर आणि रामटेककडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार विकास ठाकरे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. दुपारी 3 नंतर नागपूरमधील लढतींचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
रामटेकमध्ये आघाडीत बिघाडी
दुसरीकडे रामटेकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाही दिसत आहे. रामटेकमध्ये बंडखोरी क्षमवण्यासाठी नेते सरसावल्याचं पाहायला मिळत आहे. रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात प्रमुख लढत आहे. यासह एकूण 35 उमेदवारांचे अर्ज रामटेकमध्ये वैध ठरले आहे. रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारासमोर शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश साखरे मैदानात उतरले आहे. त्यामुळे तिथे महाविकास आघाडीमधील घटकपक्षांमध्ये तिढा निर्माण झाला आहे. सुरेश साखरे यांनी माघार घ्यावी याकरता काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे. तर काँग्रेस नेते किशोर गजभिये यांनीही काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. आता ही बंडखोरी मोडून काढण्यात महाविकास आघाडीमधील नेत्यांना यश येतं की नाही हे काही तासांमध्ये स्पष्ट होईलच.