आजारपणात पाव मुख्यमंत्री माझे सरकार पाडत होते, धाराशिवमध्ये ठाकरेंची तोफ धडाडली
पंतप्रधान मोदींना माझ्यावर प्रेम ऊतू आलंय. माझ्या आजारपणात पाव उपमुख्यमंत्री सरकार पाडण्याचे काम करत होते. ते तुम्हाला माहिती नव्हत का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. धाराशिव येथील सभेत ते बोलत होते.
Uddhav Thackeray to Narendra Modi: पंतप्रधान मोदींना माझ्यावर प्रेम ऊतू आलंय. माझ्या आजारपणात पाव उपमुख्यमंत्री सरकार पाडण्याचे काम करत होते. ते तुम्हाला माहिती नव्हत का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. धाराशिव येथील सभेत ते बोलत होते. उद्धव ठाकरेंसाठी मी धावून जाईन,असे पंतप्रधान म्हणले होते. यावरुन उद्धव ठाकरेंनी त्यांना टोला लगावला. मोदीजी तुमच्यावर संकट आल्यावर उद्धव ठाकरे देखील धावून येईल. पण सरकार पाडताना तुम्हाला माहिती नव्हत का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
हे मोदी सरकार नव्हे गजनी सरकार आहे. 2014 ला काय बोलले ते यांना 2019 ला आठवत नाही. महाराष्ट्र तुम्ही जिंकू शकणार नाही, असे ते यावेळी म्हणाले. भाजप सरकार घटना बदलण्याचा प्रयत्न करेल तेव्हा देश पेटेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.निवडणुकीवेळी हिंदु-मुस्लिम अशी भांडणे लावली जातात. पण मुस्लिम समाजाला आता आमच्यावर विश्वास आहे. जे कॉंग्रेसने केलं ते भाजपने विकलं. जे माझ्या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअक्कली आहेत. शिवसैनिक माझे वैभव आहे, हीच माझी संपत्ती आहे. कोर्टाने खडसावलं नसत तर अजून 10 हजार कोटींचे रोखे तयार होते, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी परत करेन
शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणारी अवजारे, बी बियाणे यांवरील जीएसटी माफ करेन, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले. हे सरकार उठवा, कांदा निर्यातबंदीचा निर्णय आम्ही उठवू, असे त्यांनी यावेळी सांगितले. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्र लुटायची यांची हिंमत नव्हती. महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी परत करेन. तरुणांना रोजगार उपल्बध करुन देण्याचा प्रयत्न करेन असेही त्यांनी यावेळी सांगितले.
10 वर्षात मराठवाड्याला केंद्राने काय दिलं?
हा महाराष्ट्र स्वाभीमानी आहे. मराठी माणसासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा ते घात करु पाहत आहेत. धनुष्य बाण तुम्ही चोरलात पण मशालीचा धाग मोठा आहे. या आगीने लंका आपल्याला जाळून टाकायची आहे. मराठवाड्याला पाणी कधी देणार? 10 वर्षात मराठवाड्याला केंद्राने काय दिलं? असा प्रश्न त्यांनी विचारला. ईडी,सीबीआय हे घरगडी आमच्याकडे येणार आहेत. तेव्हा सर्वांचा हिशोब चुकता करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदीजी तुम्ही गुजरातला परत जा
धाराशिवमध्ये येऊन मोदींनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं नाही. भवानी मातेचा उल्लेख केला नाही. यावरुनही त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. मोदीजी तुम्ही गुजरातला परत जा. महाराष्ट्रात तुमचं काम नाही, असेही ते यावेळी म्हणाले. तपास यंत्रणांचा वापर करुन दरोडे घातले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी भाजपवर केला.