भाजपात प्रवेश करणार की नाही? एकनाथ खडसेंनी केलं स्पष्ट, म्हणाले `पुढील 15 दिवसांत....`
LokSabha Election: एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती.
LokSabha Election: एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपा पक्ष तसंच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे ते खरंच भाजपात प्रवेश करतील का याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान आता एकनाथ खडसे यांनी स्वत: आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पुढील 15 दिवसांत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.
एकनाथ खडसे यांनी पुढील 15 दिवसांत दिल्लीला जाणार आणि भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. म्हणजेच एकनाथ खडसे यांनी पक्षातील घरवापसीवर त्यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
"मला दिल्लीतून वरिष्ठ नेत्यांचं बोलावणं आल्यानंतर पक्षप्रवेश होईल. मी भाजपात येण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नव्हते. पण भाजपातील जुने कार्यकर्ते, नेते त्यांच्याशी चर्चा करताना तुम्ही पक्षात असायला हवं होतं अशी भावना दिसत होती. तुम्ही आले तर बरं होईल अशी चर्चा वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये होती. ही चर्चा आता नव्हे तर 4 ते 6 महिन्यांपासून होती. अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही अशी विनंती त्यांना केली होती. पण आता मी त्यासंबंधी निर्णय घेतला आहे," असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
"एकनाथ खडसे भाजपात जातील असं वाटत नाही"
दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज सकाळी बोलताना एकनाथ खडसे भाजपात जातील असं वाटत नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. "एकनाथ खडसे भाजपात जातील असं वाटत नाही. भाजपात त्यांचा छळ झाला असून, याबद्दल ते अनेकदा बोलले आहेत. ते स्वाभिमानी नेते आहेत, त्यामुळे असा निर्णय घेतील असं वाटत नाही," असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यांच्या जावयाला जेलमध्ये टाकलं. त्यांनाही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. असं असताना ते भाजपात जातील असं वाटत नसल्याचं माझं मत आहे असं ते म्हणाले होते.