LokSabha Election: महाविकास आघाडीत सध्या सांगली लोकसभा (Sangali LokSabha) जागेवरुन वाद सुरु असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत विरुद्ध काँग्रेस नेते असा संघर्ष रंगला आहे. यादरम्यान आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रहार पाटीलच (Chandrahar Patil) निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपली काँग्रेस हायकमांडशी चर्चा झाल्याचा दावाही त्यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला आहे. तसंच नाना पटोले यांच्या छोट्या कार्यकर्त्याप्रमाणे वागू नका या टीकेलाही उत्तर दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आज सकाळीच माझी काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा झाली आहे. एक ते दोन दिवसात काँग्रेस पक्षाकडूनही अधिकृत घोषणा होईल. मी जबाबदारीने बोलणारा माणूस आहे. चंद्रहार पाटील यांचीच उमेदवारी कायम असेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हातात हात घालून काम करत, चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करतील. यावर आमचं एकमत झालं आहे," असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 


"जागावाटप करताना एखाद्या जागेवरुन पेच पडतोच. समोर भाजपा, मिंधे गट, अजित पवार गट आहे. त्यांच्यात तरी जागावटप कुठे नीट सुरु आहे. चर्चा करुन निर्णय घेतला असतानाही काही स्थानिक घटकांना आपण लढलं पाहिजे असं वाटत असतं. काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते आपण लढलं पाहिजे असं म्हणत आहेत. अशावेळी वरिष्ठांनी समजूत काढायची असते. सांगली आणि भिवंडीत असंच होईल," असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.  सांगलीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली आहे. विश्वजीत कदम यांच्याशीही बोलणं झालं आहे असंही ते म्हणाले. 


नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना प्रचार करायचा असल्याने त्यांनी आम्हालाही भरपूर वेळ दिला आहे. चंद्रपुरात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचाच विजय होईल. चंद्रपुरात नरेंद्र मोदींनी आणखी 5 सभा घ्याव्यात असा टोलाही त्यांनी लगावला आहे. गिरीश महाजन यांनी जळगावची जागा वाचवून दाखवावी असं आव्हानच त्यांनी दिलं आहे. शिवसेना ही जागा आधी लढवत नव्हती. त्यांची जागा दाखवण्यासाठी आता लढत असून, जिंकू असं संजय राऊत म्हणाले आहेत.