Mhada Konkan Lottery 2023 : मुंबई जवळ घर घेणा-यांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने 5 हजार 309 घरांसाठी लॉटरी काढलीय...उद्यापासून अर्जविक्रीला सुरूवात होणार आहे. या लॉटरीची नोव्हेंबरमध्ये सोडत निघणार आहे. मे महिन्यात म्हाडाने 4 हजार 654 घरांसाठी सोडत काढली होती. मात्र, सोडतीतील अनेक घरं विकली नाहीत. तसंच प्रथम येणा-यांना प्राधान्य आणि म्हाडा योजनेतील घरांना अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शिल्लक घरांसह म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनेतून उपलब्ध झालेल्या घरांसाठी सोडत आहे.


ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथे सदनिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या 5311 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा "गो लाईव्ह" कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. कोंकण मंडळाच्या सोडतीमध्ये 1010 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत.                       


7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. IHLMS 2.0 या नूतन संगणकीय प्रणाली व ॲपच्या सहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजेपासून सुरुवात होणार आहे. नवीन आज्ञावली नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios)या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम वर उपलब्ध आहे. ॲण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये  Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता  https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाईल  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी केले आहे. 


IHLMS 2.0 या संगणकीय प्रणाली अंतर्गत अर्ज नोंदणी जरी अमर्याद काळ सुरु राहणार असली तरी कोंकण मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीची लिंक 16 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत कार्यरत असणार आहे. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. 18 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11.59 पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच 18 ऑक्टोबर 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशा प्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 


प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1010 सदनिका


कोंकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1010 सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणार्‍या नागरिकांनी PMAY योजने अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. तथापि नोंदणी केलेली नसल्यास सोडतीतील यशस्वी अर्जदारांनी नोंदणी करणे बंधनकारक राहील. कोंकण मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची सोय मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियमांनुसार शुल्काचा भरणा करून यशस्वी अर्जदार नोंदणी  करून घेऊ शकतात.                 


एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1037 सदनिका,  सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 919 सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी 67 सदनिका तर कोंकण मंडळाच्या प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेल्या 2278 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  या योजनेतील शेवटची सदनिका विकली जाईपर्यंत नोंदणीकरण आणि अर्ज भरणा प्रक्रिया सुरू राहील. या योजनेतील सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्‍या अडचणीचे निराकरण करण्यासाठी 022 -  69468100  या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  तसेच प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेत सहभाग घेण्याकरिता  https://lottery.mhada.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी व अर्ज भरावा.  सोडतीतील इतर योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी https://mhada.gov.in व https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.