अजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा, म्हणाले `अतिशय दूषित वातावरण...`
Sameer Bhujbal Resignation: समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव - मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे.
Sameer Bhujbal Resignation: समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव - मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांचा राजीनामा घ्या अशा सूनाचा केल्या होत्या. त्यानंतर आता समीर भुजबळ यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पत्रात आपण नांदगाव निवडणूक का लढणार आहोत याचं कारणही सांगितलं आहे.
समीर भुजबळ यांनी पत्रात काय लिहिलं आहे?
समीर भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, "साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सुपूर्त केली होती. ही जबाबदारी पार पडत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण संघटन मजबुतीने उभे केले. यामध्ये जिल्हाध्यक्षापासून बूथपर्यंत संघटनेची बांधणी आपण केली".
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "मात्र भुजबळ कुटुंबीयांच्या ऋणानुबंध असलेल्या नांदगावमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण अतिशय दूषित झालेले असून येथील नागरिक भयभीत आहेत. नांदगावमधील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबतली कैफियत आपल्यासमोर मांडली होती. नांदगावमधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगावमधील दहशतीचं वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्विकारावा अशी विनंती".
अजित पवारांनी दिल्या होत्या राजीनामा घेण्याच्या सूचना
समीर भुजबळ महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) प्रवेश कऱण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यानंतर अजित पवार यांनी प्रदेशाध्य़क्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना समीर भुजबळांचा राजीनामा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
समीर भुजबळ अपक्ष लढणार
समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते. महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे आहे. अशा स्थितीत समीर भुजबळांसमोर अपक्ष लढण्याचा किंवा महाविकास आघाडीत प्रवेश कऱणं हे दोन पर्याय होते. दरम्यान महायुतीकडून सुहास कांदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समीर भुजबळांनी अपक्ष किंवा महाविकास आघाडीचा पर्याय निवडला तर त्यांच्यासमोर सुहास कांदेंचं आव्हान असू शकतं.