महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष कोणताही असो दबदबा घराणेशाहीचाच; 288 पैकी 237 उमेदवार राजकीय वारसदार, राष्ट्रवादी अव्वल स्थानी
Maharashtra Politics: निवडणुकीत घराणेशाहीचा विषय नेहमीच चर्चेत येतो. यावेळच्या या निवडणुकीतही घराणेशाही या विषयाची मोठी चर्चा होती. राज्यातील बहुतांश मतदारसंघात घराणेशाहीचे चित्र दिसून आले. या निवडणुकीत कोणत्या पक्षानं किती घराणेशाहीचे उमेदवार दिलेत पाहूयात.
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष कोणताही असो घराणेशाहीचाच दबदबा दिसून आला. विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघापैकी 237 मतदारसंघात राजकीय वारसदार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं वास्तव समोर आला आहे.
हे देखील वाचा... महाराष्ट्रातील धडकी भरवणारा फ्लायओव्हर! 30 मजली इमारती इतका उंच, खाली पाहिले तर चक्कर येईल
महायुतीनं 94 उमेदवार घराणेशाहीतील दिलेत तर महाविकास आघाडीनं 100 उमेदवार दिलेत. यात भाजपनं 49 तर काँग्रेसनं 39 उमेदवार दिलेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 26 तर शरद पवारांनी 39 उमेदवार दिले. दोन्ही राष्ट्रवादीच्या काँग्रेसची आकडेवारी एकत्र केल्यास घराणेशाहीतील सर्वाधिक उमेदवार हे राष्ट्रवादीनेच दिले होते.
विभागनिहाय घराणेशाहीचे उमेदवारांचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे 77 उमेदवार देण्यात आलेत. मराठवाड्यातून 39,खानदेश 38, विदर्भ 49 तर मुंबई आणि कोकणातून 34 घराणेशाहीचे उमेदवार देण्यात आलेत. घराणेशाहीतील 237 उमेदारांपैकी 89 उमेदवार विजयी झाले आहेत.
घराणेशाही केंद्रीत राजकारणामुळे सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी नाकारल्यानं सत्ता आणि संपत्तीचं केंद्रीकरण होऊन लोकशाहीचं डबकं होऊ शकतं अशी भीतीही अभ्यासकांनी व्यक्त केलीय. राजकीय घराणेशाहीविरोधात सगळेच राजकीय पक्ष बोलत असतात. पण जेव्हा कृती करण्याची वेळ येते तेव्हा उमेदवारी मुलंमुली आणि सगेसोयरे यांच्या गळ्यातच उमेदवारीची माळ घातली जातेय. विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीच्या वारसदारांची संख्या पाहता हेच अधोरेखित होतंय.