Eknath Shinde Resigned As Chief Minister Is He Unhappy: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. आज विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने पुढील सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं आवश्यक असतं. त्यामुळेच शिंदेंनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास राजीनामा दिला. यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबरच शिंदेंच्या पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर, मंत्री दादा भुसेही उपस्थित होते. राजीनामा दिल्यानंतर दीपक केसरकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांना शिंदे राजीनामा द्यावा लागल्याने नाराज आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावरही केसरकरांनी सविस्तर प्रतिक्रिया नोंदवली.  (दिवसभरातील घडामोडींचे LIVE UPDATES पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.)


एकामोमाग एक नेते राजभवनात दाखल झाले अन्


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देतील अशी शक्यता सकाळपासूनच व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार आधी उपमुख्यमंत्री अजित पवार राजभवनात पोहोचले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवानामध्ये दाखल झाले. एकनाथ शिंदे राजभवानामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून राजीमाना सुपूर्द केला. यानंतर तिन्ही प्रमुख नेते प्रसारमाध्यमांशी संवाद न साधता निघून गेले. 


शिंदे नाराज आहेत का? वर केसरकर म्हणाले...


राजभवनाबाहेर दीपक केसरकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार संभाळण्यास राज्यपालांनी सांगितलं आहे, अशी माहिती शिंदेंच्या पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली. त्यानंतर एका पत्रकाराने शिंदे नाराज आहेत का? असा प्रश्न केसरकारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, "बिलकूल नाराजी नाही. त्यांनी पक्षश्रेष्ठींनाही सांगितलं आहे की, 'जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल,' हे स्पष्ट शब्दांमध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवलं आहे," असं उत्तर दिलं.



तसेच, "मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागतो. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे," अशी पुष्टीही केसरकरांने जोडली. 


नक्की वाचा >> राजकीय घडामोडींना वेग! रात्री 12.53 AM ला CM शिंदेंची पोस्ट; म्हणाले, 'अशा पद्धतीने माझ्या...'


नवीन सरकार कधी?


नवीन सरकार कधी स्थापन होणार याबद्दल विचारलं असता, केसरकरांनी, "येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल. पक्षाचे वरिष्ठ लवकरच निर्णय घेतील", असं केसरकर म्हणाले.


नक्की वाचा >> निवडणुकीनंतरचा राज्यातील सर्वात मोठा निर्णय! गृह खात्याने...; फडणवीसांची 'ती' भेट कारणीभूत


तसेच पुढे बोलताना, "भाजपाच्या गटनेत्याच्या निवडीसाठी लवकरच बैठक होणार आहे. त्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसून चर्चा करतील. मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन जो काही निर्णय घेतली त्यानुसार महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल," असं केसरकरांनी स्पष्ट केलं.