नाशिकच्या देवळालीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने - सामने, अजित पवारांचा लेटर बॉम्ब; राजकीय वातावरण तापलं
अजित पवारांनी शिवेसनेचा लेटर बॉम्ब टाकत महायुतीचा खरा उमेदवार कोण आहे याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर देवळालीमध्ये राजकीय वातावरण तापलंय.
नाशिकच्या देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने - सामने आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय. त्यातच अजित पवारांनी शिवेसनेचा लेटर बॉम्ब टाकत महायुतीचा खरा उमेदवार कोण हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे देवळालीतील राजकीय वातावरण चांगलचं तापलंय.
हे पत्र आहे.. देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोज अहीरे यांच्या महायुतीकडून मिळालेल्या पाठिंब्यासंदर्भात. या मतदारसंघात शिवसेनेकडूनही राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आलीये. मात्र, अजित पवारांकडून हे पत्र भर सभेत वाचण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झालाय.
अजित पवारांनी शिवसेनेचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांची सही असलेले पत्र भर सभेत वाचून दाखवलंय. तरी सुद्धा राजश्री अहिरराव यांना विश्वास नसेल तर मतदार खरं खोटं करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोज अहीरे यांनी म्हटलंय.
एकनाथ शिंदेंकडून अद्यापही कुठला आदेश आला नसल्याचं शिवसैनिकांनी म्हटलंय. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराच्या मागे उभं राहणार असल्याचं शिवसैनिकांनी ठरवल्याचं म्हटलंय. ऐन निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचला असून त्यात महायुतीचा पाठिंबा राष्ट्रवादीच्या सरोज अहीरे यांना असल्याचं पत्र अजित पवारांनी दाखवल्यानं शिवसेनेच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांची चांगलीच कोंडी झालीये. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या भांडणात कुणाचा फायदा होतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल..