`...त्यात एक नाव फडणवीसांचे होते`; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावा
Maharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला एक दावा फारच हस्यास्पद असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार असलेल्या संजय राऊत यांनी केला आहे.
Maharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच त्यांच्या वक्तव्याने संपवला असल्याचा टोला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला आहे. 'सामना'मधील 'रोखठोक' सदरामधील लेखातून राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. "महाराष्ट्र निवडणुकांसाठी सज्ज झाला आहे. हा लेख लिहीत असताना शिंदे गटाचे दिल्लीतील नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन जाहीर केले की, आजच्या निवडणुका आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत, पण निकालानंतर नेता कोण हे आम्ही एकत्र बसून ठरवू. याचा अर्थ स्पष्ट आहे, शिंदे यांचा कार्यकाळ अमित शहा यांनी संपवला आहे," असं राऊत म्हणालेत.
फडणवीस यांच्यासारखे मोठे राजकारणी प्रॉपर्ट्या...
"अमित शहा आता फडणवीस यांना मुख्यमंत्री करायला निघाले आहेत, पण महाराष्ट्राची जनता फडणवीस यांची सावलीही स्वीकारायला तयार नाही. गृहमंत्री फडणवीस यांच्या तीन वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराला व गुन्हेगारीकरणाला सार्वत्रिक रूप आले. मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक गुन्हेगारी टोळ्यांचा वापर राजकारणासाठी करत आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यासारख्या नेत्यांचा खून झाला व गुन्हेगार आपल्यापर्यंत पोहोचतील या भयाने गृहमंत्र्यांनी स्वत:चीच सुरक्षा वाढवून घेतली. अतिरेक्यांविरुद्ध लढण्यासाठी निर्माण केलेल्या फोर्स वन या खास सशस्त्र पथकाचे पहारे त्यांनी आपल्या घराभोवती लावले. सामान्य माणूस वाऱ्यावर आणि गृहमंत्र्यांना सुरक्षेचा खास गराडा. ऐन निवडणुकीत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना कोणापासून धोका आहे हे राज्याच्या जनतेला कळायलाच हवे. फडणवीस यांनी नागपुरात एक गमतीचे विधान केले. ”मी पंचवीस वर्षे मुंबईत राहतो, पण माझे स्वत:चे घर मुंबई शहरात नाही.” फडणवीस यांच्यासारखे मोठे राजकारणी प्रॉपर्ट्या स्वत:च्या नावावर करत नाहीत. मुंबईतील सर्व बिल्डर्स कोणाचे? हे भाजपने सांगावे," अशी मागणी राऊतांनी केली आहे.
शिंदे यांच्या ताब्यात ‘वर्षा’सह तीन सरकारी बंगले
"अदानी यांची सर्व दौलत नरेंद्र मोदी यांचीच आहे, असा खुलासा सत्यपाल मलिक यांनी केला. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाले. मुंबई क्रिकेटशी काळे यांचा संबंधही नव्हता व योगदानही नव्हते. तरीही काळे यांना सर्व ताकद लावून फडणवीस यांनी मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष केले. काळे यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्ती व गुंतवणुकीबाबत अनेक चर्चा व नावे बाहेर आली. त्यात एक नाव फडणवीस यांचेही होते. आज एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात ‘वर्षा’सह तीन सरकारी बंगले आहेत. ‘नंदनवन’ बंगला त्यांनी सोडला नाही. फडणवीस यांच्याकडे ‘सागर’ व इतर एक सरकारी बंगला आहे. लोढा, अदानी, आशर अशा अनेक बिल्डर्सवर त्यांची कृपादृष्टी आहे. त्यामुळे फडणवीस यांना वेगळे घर कशाला हवे? या सर्व बिल्डरांमुळे मराठी माणसांना घरे मिळत नाहीत हे महत्त्वाचे. त्यांचे पोशिंदे फडणवीस व त्यांचे लोक आहेत. हेच फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ही धोक्याची घंटा आहे," असं राऊत यांनी म्हटलं आहे.