Maharashtra Assembly Election Sharad Pawar Mention Wife: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी त्यांचे मानसपुत्र दिलीप वळसे-पाटलांचा परावभ करण्याचं आवाहन आंबेगाव-शिरुरच्या मतदारांना केलं आहे. दिलीप वळसे-पाटील यांच्या विरोधात शरद पवारांनी त्यांच्या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आंबेगाव-शिरुरमधून देवदत्त निकमांना उमेदवारी दिली आहे. एकेकाळी शरद पवारांचे स्वकीय सचीव म्हणजेच पीए असलेल्या वळसे पाटलांविरुद्ध शरद पवारांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली. वळसे पाटलांचा पराभव करा, करा आणि कराच! असं म्हणत शरद पवारांनी त्यांचा उल्लेख 'गद्दार' असा केला. वळसे-पाटलांना सलग सात वेळा आमदार करण्यासाठी पवारांनी ज्या आंबेगाव-शिरुरमध्ये मागील अनेक दशकं सभा घेतल्या त्याच मतदारसंघात पवारांनी दिलीप वळसे-पाटलांवर तोफ डागल्याचं पाहायला मिळालं. यावेळेस शरद पवारांनी त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांनी केलेल्या एका विधानाचाही संदर्भ दिला.


...असं अजिबात नाही; पवारांनी स्पष्टच सांगितलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलीप वळसे-पाटलांचा मंत्रीपदापर्यंतचा प्रवास माझ्यामुळं झाला असं शरद पवारांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नमूद केलं. "आंबेगाव तालुक्याचं अन् माझं एक अतूट नातं आहे. अगदी दिलीप वळसेंना इथून मी संधी देण्याआधी पासून माझं या तालुक्याशी संबंध येत गेलाय. दिलीप वळसेंना मी संधी दिली, ते आमदार झाले याचा मला आनंद होता. पुढं मी त्यांना मंत्री केलं. विविध पदं दिली. विश्वास ठेवला, संधी दिली. जे जे शक्य होतं, ते दिलं," असं शरद पवार म्हणाले. "ज्यांना मी पदं दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात ते गेल्यानं जनतेला हे आवडलेलं नाही. आज म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत, असं अजिबात नाही," असं म्हणत शरद पवारांनी दिलीप वळसे-पाटलांचं बोलणं खोडून काढलं. यापूर्वी दिलीप वळसे-पाटलांनी अनेकदा राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतरही शरद पवारांबरोबर वैयक्तिक स्तरावर चांगले संबंध असल्याचा दावा केला होता. 


प्रतिभा पवार यांचा किस्सा सांगितला


यावेळेस शरद पवारांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासंदर्भातील एक किस्सा सांगितला. "माझी बायको परवा भीमाशंकरला गेली होती. मला माहितं नव्हतं. आल्यावर मी चौकशी केली, तुम्ही जाऊन आल्या? म्हणाल्या, हो! तुमची व्यवस्था नेहमीसारखी? नाही म्हटल्या नेहमीसारखी नाही. मी म्हटलं मला काही कळलं नाही. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही. आम्ही डायरेक्ट भीमाशंकरच्या दारात, हे त्यांनी सांगितलं," असं शरद पवार म्हणाले. 



ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची


"आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? साडेतीनशे वर्षांपूर्वी गणोजी शिर्केने छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी केली, ते महाराष्ट्र विसरलेला नाही. गणोजीला आता सुट्टी नाही, ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. या विधानसभा निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करा, करा, करा. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा," असं आवाहन शरद पवारांनी मतदारांना केलं.