Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena: "महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी मतदान पार पडले आहे. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव वगैरे म्हणण्याची प्रथा आहे, मात्र तो आता फक्त पैशांचा उत्सव झाला. ज्या पद्धतीने या निवडणुकीत सत्तापक्षांकडून पैशांचा वादळी पाऊस पडत राहिला त्यावरून हेच म्हणावे लागेल. हे चित्र आपल्या लोकशाहीसाठी चांगले नाही," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. "झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले आहे की, या निवडणुकीत त्यांची प्रतिमा भंग करण्यासाठी भाजपने पाचशे कोटी रुपयांचा खुर्दा केला. महाराष्ट्रात हा आकडा दोन हजार कोटींवर नक्कीच गेला असेल," अशी शंकाही ठाकरेंच्या पक्षाने बोलून दाखवली आहे.


आयोगाच्या लोकांनी कोणत्या दरवाजाचा वापर केला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मतदानाच्या एक दिवस आधी मुंबई, विरार-नालासोपारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी कोट्यवधींचे खोके सापडले आणि हे वाटप भाजप व मिंधे यांचेच लोक करीत होते. मतदानाला काही तास उरले असताना पैशांची ही धरपकड झाली. याचा अर्थ याआधी पैसा मोठ्या प्रमाणात मतदारसंघांमध्ये पोहोचला व पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप करून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीस बट्टा लावण्याचा हा प्रकार बिनबोभाट घडत असताना आपला तो निवडणूक आयोग झोपाच काढत असावा," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. "नालासोपारा, विरार भागात भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे पैशांच्या बॅगा घेऊन एका हॉटेलात शिरले व वाटप सुरू करताच तेथे निवडणूक आयोगाचे लोक पोहोचले नाहीत, तर हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीचे लोक पोहोचले. चार तास तावड्यांना घेराव घालून ‘जाम’ केले. तावडे यांच्या खोलीत पैसे होते, पण निवडणूक आयोगाने वेळेत पंचनामा करून गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल केला तो आचारसंहितेचा भंग केल्याबाबत. म्हणजे निवडणूक आयोगाचे नियम मोडून पत्रकार परिषद घेतली वगैरे किरकोळ विषयांवर. तावड्यांकडे पाच कोटी होते, पण आयोगाने फक्त नऊ लाख कागदावर आणले असा आरोप आमदार ठाकूर करत आहेत. मग वरचा मलिदा सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलीस, आयोगाच्या लोकांनी कोणत्या दरवाजाचा वापर केला?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.


नालासोपाऱ्यात ‘तावडे’ यांचा गेम


"सांगोल्याच्या टोल नाक्यावर मिंधे गटाच्या आमदारांचे पंधरा कोटी पकडले गेले होते, पण थातूरमातूर रक्कम जप्त करून उरलेली रक्कम ज्याची त्याला परत करून निवडणूक आयोग व पोलिसांनीही आपले मिंधेगिरीचे कर्तव्य पार पाडले. सांगोल्यात गाडी व ड्रायव्हर हा सरळ आमदाराचा होता. तरीही त्यांना वाचविण्याचा थुकरटपणा हा केलाच. नालासोपाऱ्यात ‘तावडे’ यांचा गेम मिंध्याने केला की भाजपमधील अन्य कोणी केला, हे रहस्यच आहे. कारण नंतर एक फोन आला व ठाकूर मंडळ त्याच तावड्यांसह कुठेतरी बसायला व बोलायला एकाच गाडीतून गेले," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.


हिंदू-मुसलमान दुफळ्या माजवून...


"जनतेला मूर्ख बनविण्याचे हे खेळ लोकशाहीत सुरू आहेत. महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पैशांचे वाटप झाले. पैशांचा महापूरच आला. या महापुरात कोण कसे वाहून गेले व कोण निष्ठेच्या विटांवर तरले हे पुढच्या 72 तासांत कळेल, पण निवडणुका आता लोकशाहीचा उत्सव राहिला नसून भ्रष्ट पैशांचा उत्सव झाला हे नक्की. निवडणुकांवर सट्टा लावला जातो व त्या सट्टेबाजीत शेकडो कोटींची उलाढाल होते. मतदार यादीतून लाखो मतदारांची नावे गायब केली जातात. धर्माच्या नावावर घाणेरडा प्रचार करून अखेरच्या क्षणी ताणतणाव वाढवून मतांसाठी ‘बांग’ मारली जाते. हिंदू-मुसलमान दुफळ्या माजवून ‘जिहाद जिहाद’ अशा आरोळ्या ठोकल्या जातात व तुमचा निवडणूक आयोग भाजपचा मिंधा बनून हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत बसतो," अशी टीका ठाकरेंच्या पक्षाने केली आहे.


पैशांच्या महापुरात मराठी स्वाभिमान वाहत गेला नसेल


"लोकशाही हाच देशाचा धर्म आहे. त्या धर्मासाठीच स्वातंत्र्याचा संग्राम झाला, पण निवडणुका म्हणजे धर्मयुद्ध असल्याचे सांगत भाजप व संघाचे लोक घराघरात पोहोचले. लोकांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रासारख्या राज्यात हे घडत असताना देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री त्यांच्या सरकारी लवाजम्यासह महाराष्ट्रात तळ ठोकून बसले. लोकशाहीवर दबाव आणण्याचा हा प्रकार होता. पंतप्रधान व देशाच्या गृहमंत्र्यांनी पंधरा-पंधरा दिवस एखाद्या राज्यात तंबू ठोकून बसणे लोकशाहीला घातक आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणेचा गैरवापर त्यात होतो. नव्हे, तो कालच्या निवडणुकीत झालाच आहे. तरीही महाराष्ट्राने सावधपणे मतदान केले. लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाला, पण महाराष्ट्रात लोकशाही जिवंत राहील. महाराष्ट्राचा अभिमान विजयी होईल. पैशांच्या महापुरात मराठी स्वाभिमान वाहत गेला नसेल याबाबत आमच्या मनात शंका नाही," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.