महाराष्ट्रात मोठा राजकीय प्रयोग फसला? मनोज जरांगे यांच्या खळबळजनक दाव्यानंतर राजरत्न आंबेडकर यांचा खुलासा
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघारीची घोषणा केली. मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी दिली नव्हती, असा दावा जरांगेंनी केला होता. त्यावर आता राजरत्न आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिलंय. यादी दिली नाही हे चुकीचं कारण असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय. त्यामुळे जरांगे आणि मित्रपक्षांमध्येच उमेदवार यादीवरून जुंपल्याचं चित्र आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीतून ऐनवेळी मनोज जरांगेंनी माघार घेतली. माघार घेताना त्यांनी मित्रपक्षांनी उमेदवारी यादी दिली नसल्याचा दावा केला होता. जरांगेंचा हा दावा भारतीय बौद्ध महासभेचे नेते राजरत्न आंबेडकरांनी फेटाळलाय. मनोज जरांगेंकडे बौद्ध महासभेच्या उमेदवारांची यादी दिली होती असा दावा राजरत्न आंबेडकरांनी केलाय. यादी दिली नाही हे कारण सांगणं चुकीचं असल्याचं राजरत्न आंबेडकर म्हणालेत.
राजरत्न आंबेडकरांनी जरांगेंचा दावा खोडून काढल्यानंतर जरांगेंनी पुन्हा त्यावर प्रतिक्रिया दिलीय. तो विषय आता संपलाय. राजरत्न आंबेडकर असं काही म्हणाले असतील असं मला वाटतं नाही, अशी सावध प्रतिक्रिया जरांगेंनी दिलीय.
जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली मात्र उमेदवारी माघारीवरून मित्रपक्षांसोबतच त्यांची जुंपली आहे. निवडणुकीतून माघार घेतली असली तरी उमेदवार पाडणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला मोठा फटका बसला होता. आता विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
निवडणुकीतून माघारीची घोषणा करून यू-टर्न
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा करून यू-टर्न घेतलाय. अंतरवाली सराटीतल्या पत्रकार परिषदेत जरांगेंनी ही घोषणा केलीय. सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय. आता निवडणूक लढायची नाही तर पाडायचं असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय.
जरांगेंची माघार का?
मित्रपक्षांकडून उमेदवार यादी आली नाही. एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. मराठा उमेदवार पडला तर जातीची लाज जाईल
ही माघार नाही, हा गनिमी कावा आहे. कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही असे जरांगे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला बसला होता. मात्र आता शेवटच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून जरांगे पाटलांनी माघार घेतलीय. उमेदवार उभे करणार नसलो तरी निवडणुकीत पाडापाडी करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय.