महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार
Amit Thackeray : मुंबईतील माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे. मनसेचे अमित ठाकरे, शिवसेनेचे सदा सरवणकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत मुंबईच्या माहिम मतदार संघात पहायला मिळणार आहे. राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरले आहेत. ते आहेत अमित राज ठाकरे. राज ठाकरे यांचे पूत्र.. आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष. अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे यांच्याविरोधात ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार निवडणूक लढणार आहेत.
मंगळवारी मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. महिम हा मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिले किल्ल्याजवळ असलेला मतदार संघ आहे. याच माहिम मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे निवडणूक लढणार आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने देखील उमेदवारी दिली आहे. दादर माहिममधून शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. शिवसेना पदाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नाव जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. अमित ठाकरेंना माहिममध्ये संघर्ष करावा लागेल पण ते निश्चित विजयी होतील, असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय.
कोण आहेत महेश सावंत?
बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरील राडा प्रकरणात ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आले होते. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह आणखी दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.