Dada Bhuse on Sharad Pawar: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपाला राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उत्तर दिलं आहे. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांचा उल्लेख केल्याने अजित पवार (Ajit Pawar) यांनी आक्षेप घेतला. संजय राऊत भाकरी मातोश्रीची (Matoshree) खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात असं दादा भुसे म्हणाल्याने अजित पवार संतापले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गदारोळ घातल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वक्तव्य तपासण्याचं आश्वासन दिलं आहे. 


संजय राऊतांनी काय आरोप केला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो   नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल," असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. 



दादा भुसे यांनी दिलं उत्तर - 


संजय राऊतांच्या आरोपावर दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन दिलं. "संजय राऊत हे महागद्दार आहेत. त्यांनी काल एक ट्वीट केले. जगाच्या पाठीवरील कोणत्याही तपास यंत्रणेमार्फत चौकशी करा. आरोप सिद्ध झाले तर मंत्रीपद, आमदारकी आणि राजकारण सोडून देईन. मालेगावचे सैनिक या गद्दाराला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही," असं दादा भूसे म्हणाले. 


संजय राऊत भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात असं विधान यावेळी त्यांनी केलं. तसंच येत्या २६ तारखेपर्यंत संजय राऊत यांनी माफी मागितली नाही तर मालेगाव सैनिक हे महागद्दार राऊत यांनी जागा दाखवतील असा इशारा दिला. 


राष्ट्रवादीने घेतला आक्षेप - 


दादा भुसे यांनी शरद पवार यांचा उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. अजित पवार यांनी यावेळी शरद पवार यांचे नाव घेण्याची गरज नाही असं म्हटलं. दादा भुसे यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही दिलगिरी व्यक्त करत हे शब्द मागे घ्या. अन्यथा आम्ही सभात्याग करु असं अजित पवार म्हणाले.


यावर दादा भुसे यांनी यावर आपण शरद पवार यांच्याविषयी चुकीचं बोललेलो नाही असं सांगत आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला. मी जर चुकीचं बोललो असेन, तर वक्तव्य तपासून घ्या आणि योग्य ती कारवाई करा असंही ते म्हणाले. 




शंभुराज देसाई यांनी यावेळी शरद पवारांचं योगदान सर्वांनाच माहिती आहे. दादा भुसे हे संजय राऊत यांच्याबद्दल बोलले आहेत. आमच्या मतांवर जिंकून आले, पण आम्हालाच खालच्या शब्दात बोलतात. शरद पवारांविषयी काही बोललेलं चालणार नाही. आम्हाला शरद पवार यांचा अवमान करण्याचा नाही. संज राऊत यांच्याविषयी आमची भूमिका मांडली आहे असं ते म्हणाले. 


जयंत पाटील यांनी यावेळी उभं राहत दादा भुसे यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला असून तो काढून टाकावा अशी मागणी केली. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 
वक्तव्य तपासलं जाईल, शरद पवार यांना एकेरी शब्दात बोलले असतील तर ते वक्तव्य काढले जाईल असं आश्वासन दिलं.