हर्षवर्धन पाटील कोरोना बाधित, मुलीच्या लग्नाने वाढवली डोकेदुखी?
दोन दिवसांपूर्वीच झालेल्या लग्न सोहळ्यात अनेक नेते उपस्थित होते
Harshwardhan Patil tested corona positive : भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भाजपचे आणखी एक नेते कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी ट्विट करुन याबाबची माहिती दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती असं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.
दोन दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांचा विवाह निहार ठाकरे यांच्याशी झाला होता. मुंबई झालेल्या या विवाह सोहळ्याला राज्यपालांसह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
कालच खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन दिली होती.